सातारा जिल्हाहोम

पी.डी. पाटील प्रतिष्ठानचा पुरस्कार आनंददायी – पद्मभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी 

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव; सातारा जिल्ह्याशी नाळ कायम - बाळासाहेब पाटील 

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव चव्हाण, पी.डी. पाटील यांच्याशी निळकंठ कल्याणी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पी.डी. पाटील पाटील यांनी तब्बल 43 वर्षे नगराध्यक्षपद भूषवत कराड शहराचा आमूलाग्र विकास केला, आदर्श सांडपाणी व्यवस्था राबवली. दूरदृष्टीतून चांगले काम करण्याची हिम्मत दाखवली. आज त्यांच्या प्रतिष्ठानचा मिळणारा पुरस्कार हा आनंददायी असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसादन येथे आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ २०२५ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, भारत फोर्ज पुणेचे अध्यक्ष, पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, बाळासाहेब पाटील होते. यावेळी सौ. सुनीताताई बाबासाहेब कल्याणी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

देश आणि जागतिकीकरणावर बोलताना बाबासाहेब कल्याणी म्हणाले, आपला देश आज वेगळ्या गतीने वाटचाल करत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी सुरू केलेले व्यवसाय आज जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, अमेरिका यांसारख्या देशात पोहोचला आहे. एक भारतीय म्हणून जगाच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही, हे सर्वांनी दाखवून दिले पाहिजे. आपण विकसित केलेल्या तंत्रज्ञानानुसारच आपण काम करतोय, ही एक भारतीय म्हणून असलेली भूमिका देशाला पुढे घेऊन जाणारी आहे. 145 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात तरुणांची संख्या जास्त असून, शिक्षण व्यवस्थेवर आणखीन लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. फक्त एआय आणि अन्य तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता, त्या गोष्टी तयार करता आल्या पाहिजेत. आपल्या तरुणांमध्ये ती क्षमता आहे. आपण एक मोठी अर्थव्यवस्था बनवली पाहिजे. आपली शहरे, खेडे सुधारली पाहिजेत, लोकांना सर्व सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. स्वातंत्र्यापासूनच्या 75 वर्षांत ही कामे सरकार करत होते. आज तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ही कामे केली पाहिजेत. भारत फोर सीएसआरच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गावांत काम सुरू आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणले, दुष्काळग्रस्त भाग सुजलम-सुफलम करण्यासाठी बंधारे, वनराई केल्या, स्वच्छता, रस्त्यांसारख्या सुविधांवर भर दिला. या गावांमध्ये पाच-सात वर्षांत घरटी उत्पन्न पाचपट वाढले आहे, ते आणखी दोन वर्षांत आठपट करायचे आहे. अशा कामांना आम्ही सर्वोतोपरी मदतही करतो. गावातील लोकही तळमळीने काम करतात. आज गाव सोडून बाहेर गेलेले लोक गावात परत येत आहेत, ही या कामांची मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

2012 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी शस्त्रे बनवणारे परवाने मिळवले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपला देश प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला सुरुवात झाली. आधुनिक शस्त्र निर्मितीचे कौशल्य नसल्याने ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले. मात्र आज भारत फोर्जसह अनेक खाजगी कंपन्या स्वतःच्या तंत्रज्ञानावर शस्त्रे निर्माण करत आहोत. आर्थिक उत्पन्न आणि संरक्षण क्षेत्रातील ताकद या गोष्टी देशाची ताकद आहेत, त्यामुळे कोणताही देश आपल्याला कमी लेखण्याची हिंमत करत नाही, वाकड्या नजरेने पाहत नाही. गाव, नागरिक आणि देशासाठी आम्ही हवी ती मदत करायला नेहमी तयार असतो. धंदा फक्त नफा कमवण्यासाठी नसतो, तर त्याचा फायदा आपला देश, गाव व लोकांचा विकास करण्यासाठी करायला हवा. या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केल्यास देश झपाट्याने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पी.डी. पाटील प्रतिष्ठानने दिलेला पुरस्कार आपल्या मातीतला पुरस्कार असल्याचे सांगत त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. तसेच प्रतिष्ठानने पुरस्कारासाठी दिलेली रोख रक्कम त्यांनी प्रतिष्ठानला देणगीरुपी परत केली.

उल्हास पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रभावळीत अनेक लोक होते. त्यात एक पी.डी. पाटील होते. सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून किर्लोस्कर, ओगले, कल्याणी हे उद्योजक होते. आज बाबासाहेब कल्याणी उद्योग क्षेत्रात एक नंबरवर असताना, ते गाव आणि तेथील लोकांना विसरले नाहीत. संरक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. बाबासाहेब कल्याणी त्यांच्या कार्याची यशस्वी कमान जगभरात उंचावली जाईल, असे सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड, साताऱ्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी योगदान दिले. यांत उद्योजक निळकंठ कल्याणी यांचाही समावेश आहे. त्यांनी देश व जागतिक पातळीवर मोठे नाव कमावले. त्यासोबतच त्यांनी सातारा, कराडसह आपल्या गावाची नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासली. आज उद्योग, व्यवसाय पुढे नेत सामाजिक वारसाही जोपासण्याचे काम बाबासाहेब कल्याणी करत आहेत. सीएसआरच्या माध्यमातून जवळपास 120 गावे दत्तक घेऊन तेथे सोयी, सुविधा निर्माण करत आहेत. या माध्यमातून कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात त्यांनी मोठे काम उभारले आहे. तसेच साहित्यिक, राजकारणी, समाजकारणी उल्हासदादा पवार यांचे यशवंतराव चव्हाण यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनीही लोकहिताची अनेक कामे केली. या दोघांचे कार्यक्षेत्र पुणे असले, तरीही त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याची नाळ कायम ठेवले असल्यास त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अशोक गुजर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच पी.डी. पाटील यांनी कराड शहराच्या केलेल्या सर्वांगीण विकासाचा कराड पॅटर्न राज्यभरासाठी आदर्शवत ठरल्याचे त्यांनी सांगितले. विठामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर किल्ल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोकराव गुजर व विश्वस्त रेश्मा कोरे यांनी केले. परिचय विजय साळुंखे व शहाजी क्षीरसागर यांनी करून दिला. मानपत्र वाचन अॅड. मानसिंगराव पाटील, तर दिलीपराव चव्हाण यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles