सेवा पंधरवड्यानिमित्त प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्याची तयारी
कराड/प्रतिनिधी : –
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत कराड तालुक्यात “सेवा पंधरवडा” आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, तसेच प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
सेवा पंधरवड्याच्या पूर्वतयारीसाठी ९ ते १७ सप्टेंबरदरम्यान सर्व गावांमध्ये ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील व विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे सचिव यांच्या उपस्थितीत शिवारफेऱ्या घेण्यात येणार आहेत. यादरम्यान गावातील रस्ते, पायवाटा यांचे सर्वेक्षण होणार असून, आढळलेल्या अतिक्रमणांबाबत १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येईल. यावेळी शेत रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेतली जातील. तसेच सामोपचाराने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होईल. भूमिअभिलेख विभागाकडून रस्त्यांचे सीमांकन करून त्यांची नोंद नकाशात व अभिलेखात करण्यात येणार आहे. यानंतरही विवादग्रस्त रस्त्यांबाबत तहसीलदार यांच्या स्तरावर १ ऑक्टोबर रोजी दुसरी जनता रस्ता अदालत आयोजित होणार आहे.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २२ ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने सन २०११ पूर्वी शासनाच्या जमिनीवर उभारलेली अतिक्रमित घरे पात्र लाभार्थ्यांना पट्टे देऊन नियमित केली जाणार आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक बेघरांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, या सेवा पंधरवड्यात महसूल विभागाच्या विविध सेवांचा थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी, महाराजस्व अभियान, सामाजिक अर्थसहाय, वारसनोंदी अद्ययावत करणे, जमीन पुनर्वसन, वर्ग २ ते वर्ग १ मध्ये ७/१२ रूपांतर, तसेच ‘अ’ वर्गातील पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून कराड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सेवा पंधरवड्यातील उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.