सातारा जिल्हाहोम

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप ‘सेवा पंधरवडा अभियान’ राबविणार – आ.डॉ. अतुल भोसले

जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवडा अभियान’ राबविण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीरे, स्वच्छता, सामाजिक सेवा, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिरांनी होणार असून, १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिरे भरविली जाणार आहेत. तसेच कुपोषण निर्मूलन आणि पोषण आहार वितरण यावर विशेष भर दिला जाणार आहे. १९ व २० सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन, तसेच त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले जाईल. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. २२ व २३ सप्टेंबर रोजी विशेष व दिव्यांग व्यक्तींचा सन्मान आणि त्यांना उपकरणांचे वितरण केले जाणार आहे.

२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, बुथ कार्यकर्ता बैठक, ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाचा प्रसार करण्यात येणार आहे. २७ व २८ सप्टेंबर रोजी भाजयुमोच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोदी विकास मॅरेथॉन, तसेच २५ डिसेंबरपर्यंत खासदार चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन, ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवून या सेवा पंधरवडा अभियानाची सांगता होणार आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.

Related Articles