सातारा जिल्हाहोम

शामराव पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात 

सभासदांना सहा टक्के लाभांश - अॅड. उदयसिंह पाटील 

कराड/प्रतिनिधी : –
सहकारी चळवळीत काळानुरूप कायद्यात व धोरणात सातत्याने बदल होत असले तरी आर्थिक सहकारी संस्था स्पर्धेच्या काळात यशस्वीपणे चालवण्यासाठी आर्थिक शिस्त आणि सर्वांगीण विचार महत्त्वाचा आहे. सहकारी संस्थांमध्ये पारदर्शक कामकाज करून समाजकारणाची बांधिलकी जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले.
कै. स्वा.सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उंडाळे येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सभासदांना ६ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे होते. यावेळी कराड खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन के. टी. पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मणराव देसाई, रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, सीए तानाजीराव जाधव, जि.प. सदस्य प्रदीप पाटील, पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक ब. ल. पाटील गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अॅड. पाटील म्हणाले, स्व. विलासकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी भागातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली. आज ही संस्था ग्रामीण भागात अर्थकारणाबरोबर समाजकारणाची जोड देत आदर्शवत कार्य करत आहे. रोजगार निर्मितीसाठी आयोजित महारोजगार मेळाव्यामुळे संस्थेने आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. सभासदांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य उद्देशासाठी वापर करून वेळेत परतफेड करावी, हे संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन शहाजी शेवाळे म्हणाले, स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांनी ग्रामीण व डोंगरी भागातील गरीब, अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास जनतेला सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठीच पतसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या प्रगतीत अॅड. उदयसिंह पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून पतसंस्था आज एक आदर्शवत संस्थेच्या रूपात नावारूपास आली आहे.
संस्थेची आर्थिक कामगिरी सादर करताना त्यांनी सांगितले की, संस्थेचे भागभांडवल ११ कोटी १० लाख, राखीव निधी १२ कोटी ७९ लाख, गुंतवणूक ७२ कोटी २५ लाख, ठेवी १७२ कोटी ९० लाख, कर्जवाटप १२८ कोटी ८९ लाख असून एकूण नफा १ कोटी ३० लाख रुपये झाला आहे. एनपीएचे प्रमाण ३.५४ टक्के असून यावर्षी सभासदांना ६ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे.
सभासदांना विविध कर्ज योजना, अपघात विमा योजना तसेच जनता अपघात विमा योजनेचा लाभ दिला जात आहे. सभासदाच्या अपघाती निधन झाल्यास वारसांना एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. आधुनिक सुविधांकडे वाटचाल करत संस्थेने नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस सुविधा, सीबीएस प्रणाली सुरू केली असून सातारा, सांगली, पुणे व ठाणे जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र विस्तारले आहे. ठाण्यात तळमवले, कोपरखैराणी आणि घणसोली येथे लवकरच नवीन शाखा सुरू होणार असून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येणार आहेत.
सभेत पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन ब. ल. पाटील गुरुजी व रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. धनाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. नोटीस व अहवाल प्रभारी व्यवस्थापक अधिकराव शेळके यांनी वाचला. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ यांनी मानले. सभेस सभासद, ठेवीदार, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles