सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कॅन्सरबाबत पालक आणि मुलांमध्ये जनजागृती आवश्यक – डॉ. सुरेश भोसले
कृष्णा हॉस्पिटलच्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव
9 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
लहान मुलांमध्ये कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु, जीवनशैलीतील बदल आणि जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत पालक आणि मुलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कराडच्यावतीने ‘लहान मुलांमधील कॅन्सर जनजागृती’ अभियानाच्यानिमित्ताने कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लायन्स इंटरनॅशनलच्यावतीने दरवर्षी १३ सप्टेंबर हा दिवस ‘लहान मुलांमधील कॅन्सर जनजागृती अभियान दिन’ म्हणून पाळला जातो. सप्टेंबर महिनाभर हे अभियान सुरू राहते. यानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ कराडतर्फे कृष्णा हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारात दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, लायन्स क्लबच्यावतीने डॉ. सुरेश भोसले यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी कणवीकर-गुडूर, डॉ. प्रणिता पाटील यांच्यासह कॅन्सर युनिटमधील सर्व डॉक्टरांचाही लायन्स क्लब कराडच्यावतीने सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमध्ये १९९५ पासून कर्करोग विभाग कार्यरत असून, आतापर्यंत ५०,००० हून अधिक कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच दररोज सुमारे १५० रुग्ण ओपीडीद्वारे तपासले जातात. आजच्या काळात वैद्यकीय शास्त्र अधिक प्रगत बनले आहे. वेळेवर निदान, योग्य उपचाराने दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे कॅसरग्रस्त रुग्णांनी भिती न बाळगता उपचारासाठी पुढे यावे आणि आनंदी आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा.
यावेळी त्यांनी लायन्स क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यात कृष्णा हॉस्पिटलसोबत संयुक्तरित्या आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाला लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष सतीश मोरे, सचिव सुप्रीम तावरे, खजिनदार दशरथ वाघमोडे, प्रथम उपाध्यक्ष योगेश देशमुख, नईम कागदी, प्रवीण राव, विजय खबाले, अनिल पवार, राहुल कुंभार, सुहास जगताप तसेच इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कृष्णा हॉस्पिटल राज्यात दोन नंबरला
कृष्णा हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजना राबवून कॅन्सरवर मोफत उपचार केले जातात. महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार येथे उपलब्ध करून दिले जातात. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कृष्णा रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
9 1 minute read