सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
कराडचे सुपुत्र प्रा. चेतन दिवाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
12 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
वारुंजी (ता. कराड) येथील सुपुत्र, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयात प्र-प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा. चेतन दिवाण यांना पुणे येथे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल डॉ. भूषण गोखले, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते व प्राचार्य सुधाकरराव जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या वीस वर्षांपासून प्रा. दिवाण हे व्यावसायिक समाजकार्य, मानसिक आरोग्य, दिव्यांगत्व, संशोधन व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाधारित अध्यापनशैलीतून साध्या भाषेत मार्गदर्शन करणे, नवोपक्रम राबवून त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे यातून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परिषदेचे अध्यक्ष, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समाजकार्य विषयाच्या सेट परीक्षेचे चेअरमन म्हणून कार्य केले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व दिव्यांग विभागांच्या विविध समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
व्यसनमुक्ती मोहिमा, कोविड काळात हेल्पलाईन केंद्रांची उभारणी, मानसिक आरोग्य संवर्धन व दिव्यांग क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या समारंभात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना आदर्श कुलगुरू, सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू, शिक्षणाधिकारी प्रा. भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक, डॉ. रामदास झोड यांना आदर्श संस्थापक तसेच प्राचार्य स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा. चेतन दिवाण यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
12 1 minute read