सातारा जिल्हाहोम

कराड पालिकेचे निवृत्त अभियंता ए. आर. पवार यांना सर विश्वेश्वरय्या पुरस्कार जाहीर

अभियंता दिनानिमित्त कराडमध्ये पुरस्कार  सोहळ्याचे आयोजन 

कराड/प्रतिनिधी : –

दि. कराड आर्किटेक्टस्‌ अँड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी अभियंता दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर यावर्षीही वैभवशाली सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कराड पालिकेचे निवृत्त अभियंता ए. आर. पवार यांना ‘विश्वेश्वरय्या पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सोमवार, दि. १५ रोजी सायंकाळी ६ वाजता वेणुताई चव्हाण स्मारक येथे हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच आमदार मनोज घोरपडे व आमदार अतुल भोसले हेही या सोहळ्याला उपस्थित उपस्थित राहणार आहेत. यावेळी नितीश प्रमोद बेरी यांचे तज्ज्ञ व्याख्यान होणार असून, कराड शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे सविस्तर प्रेझेंटेशन सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कराड शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार असल्याचा ठाम विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले, १९९२ साली स्थापन झालेली कराड आर्किटेक्टस्‌ अँड इंजिनिअर्स असोसिएशन ही बांधकाम क्षेत्रातील वास्तुविशारद, अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांचे व्यासपीठ आहे. स्थापनेपासूनच संस्था आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना, प्रशिक्षण शिबिरे, कामगार कल्याण, तांत्रिक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे. शहर व परिसरातील विकासकामांमध्ये सातत्याने योगदान देत असोसिएशनने बांधकाम क्षेत्रातील शिस्तबद्ध प्रगती साधली आहे.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन चव्हाण, सचिव ॲड. राजेंद्र जाधव, खजिनदार लक्ष्मण पांढरपट्टे यांच्यासह संचालक मंडळातील अमित उंब्रजकर, दिग्विजय जानुगडे, धैर्यशील यादव, आधिकराव पवार, विक्रमसिंह पाटील, राज जगताप, विनायक करडे, अमोल जगताप व संदीप देवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles