सातारा जिल्हाहोम

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील यांचे निधन

कराड/प्रतिनिधी : – 

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष, तांबवे (ता. वाळवा) गावचे सुपुत्र नेताजी (आबा) शहाजीराव पाटील (वय ७५) यांचे गुरुवार, दि. ४ रोजी निधन झाले.

राजारामबापू दूध संघाच्या संचालक मंडळावर ते १९९२ पासून कार्यरत होते. एकूण ३३ वर्षांच्या कारकीर्दीत ते साडेचार वर्षे उपाध्यक्ष, तर १२ वर्षे अध्यक्ष होते. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. नेताजी पाटील यांच्या कारकिर्दीत संघाने दूध उत्पादकांच्या हिताच्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. संघाच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तांबवे येथील शहाजीदादा पाटील जय भवानी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्ष होते.
ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे, साईसम्राट उद्योग समुहाचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर धैर्यशील पाटील यांचे चुलते होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, तीन बहिणी, पुतणे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
तांबवे गावावर शोककळा
नेताजी पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच तांबवे गावावर शोककळा पसरली. सायंकाळी चार वाजता कृष्णाकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार जयंत पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, तानाजी मोरे, लिंबाजी पाटील, सरपंच सुभाष खराडे, उपसरपंच पवन मोरे, अवधूत पाटील उपस्थित होते.

Related Articles