सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून आश्वासने, समन्वयकांचा आरोप
34 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंतरवली सराटी येथून लाखो बांधवांसह मुंबई गाठून सुरु केलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा अखेर सरकारशी चर्चेत तोडगा निघाला. उपोषणाच्या अखेरच्या दिवशी सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेतली आणि विविध महत्त्वाच्या आश्वासनांची घोषणा केली. मात्र या आश्वासनांमध्ये हैद्राबाद आणि सातारा अशा दोन स्वतंत्र गॅझेटची तरतूद केल्याने मराठा समाजात फुट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात समन्वयकांनी पत्रकार परिषदेत हा रोप केला. समन्वयक म्हणाले, हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करण्यात येईल, सातारा गॅझेट महिनाभरात जाहीर केले जाईल, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने केला जाईल, आंदोलनादरम्यान नोंदविलेल्या गुन्ह्यांची मागे घेण्यात येईल, आंदोलनात प्राणाची आहुती देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी दिली जाईल, आंदोलनासाठी आलेल्या वाहनांवर आरटीओकडून झालेला दंड माफ करण्यात येईल, अशी सरकारकडून आश्वासने देण्यात आली आहे. मात्र सातारा आणि हैद्राबाद गॅझेट स्वतंत्र काढणे योग्य नाही. दोन्ही गॅझेट एकत्र लागू करणे आवश्यक होते. दोन स्वतंत्र गॅझेट म्हणजे समाजात फूट पाडण्यासारखे आहे, असे ठाम मत मराठा समाजाच्या समन्वयकांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर समन्वयकांनी टीका केली. ते म्हणाले, जरांगे-पाटील यांच्या उपोषणादरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच पक्षांचे आमदार-खासदार त्यांना भेटले आणि चर्चेत सहभागी झाले. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार व मंत्री यांनी मात्र याबाबत उदासीनता दाखवल्याची खंत व्यक्त करण्यात आली. समाजाच्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा पुढील काळात त्यांना त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजाच्या हक्कासाठी लढा देताना आंदोलकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. अखेर सरकारने चर्चेत सकारात्मक भूमिका घेत काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिल्यानंतर जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सायंकाळी मुंबईहून परतलेल्या मराठा समन्वयक आणि आंदोलन बांधवांनी कराड शहरात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यावेळी जल्लोष साजरा केला.
34 1 minute read