प्रवेशप्रक्रियेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित -अशोकराव थोरात

कराड/प्रतिनिधी : –
इयत्ता अकरावीचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर २६ मेपासून शासनाने ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. परंतु, आज २ सप्टेंबरपर्यंत अनेक फेऱ्या पूर्ण होऊनही राज्यातील ज्युनिअर कॉलेजेसमध्ये प्रवेशप्रक्रिया रखडलेली आहे. परिणामी, अकरावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नसून, हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले आहे.
याविषयी गंभीर चिंता व्यक्त करताना श्री. थोरात म्हणाले, विद्यार्थी व पालक हितासाठी किमान १ ऑगस्टपासून वर्ग सुरू होणे आवश्यक होते. मात्र आजअखेरही प्रवेश रखडल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणप्रवाहातून बाहेर पडले आहेत. ग्रामीण व निमशहरी भागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद केल्याशिवाय हे नुकसान थांबणार नाही.
या संदर्भात श्री. थोरात यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण आयुक्त, संचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. परंतु, शासनाने त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक अनुदानित व विना-अनुदानित तुकड्या अद्याप रिक्त आहेत. “अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? शासनाला ग्रामीण, शहरी गरीब, शेतकरी, मागासवर्गीय व आदिवासी मुलांना शिक्षण द्यायचे नाही का?” असे थेट प्रश्न श्री. थोरात यांनी शासनाला विचारले आहेत.
तसेच प्रवेश न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांत असंतोष निर्माण झाला असून, शासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे अशोकराव थोरात यांनी स्पष्ट केले.