मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था सुरू केली आहे. मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्याखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था शिक्षण, मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत 63 विविध उपक्रम राबवत आहे.
सारथी संस्थेमधील सन 2021-22 ते 2024-25 एकूण चार वर्षांमध्ये 8 लाख 38 हजार 477 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत मार्गदर्शन घेऊन विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनावर आतापर्यंत 647 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. सारथी संस्थेमधील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवडून येण्याचा नवीन उच्चांक निर्माण करत आहेत.
शैक्षणिक संधी व शिष्यवृत्ती योजना
सारथी मार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, मार्गदर्शन यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. सारथीच्या स्थापनेपासून 2020 ते 2024 या कालावधीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षेमध्ये 112 विद्यार्थी निवडून शासनामध्ये सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये 2020 ते 2023 या कालावधीत 1048 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून वर्ग एक मध्ये 229 तर वर्ग दोन मध्ये 819 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सारथी मार्फत राबविण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुकास्तरावर राबवण्यात येतो. या योजनेमध्ये कालानुरूप विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. सन 2022 ते 2025 या कालावधीत एक लाख 20 हजार लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार होते, त्यापैकी 97 हजार 286 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून 34 हजार 304 लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी 7365 लाभार्थ्यांना नोकरी मिळाली असून 9418 लाभार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. सध्या महाविद्यालयांमध्ये 17 हजार 251 लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर येथे आयटीआय, पदविका व अभियांत्रिकी पदवी प्राप्त 1012 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यापैकी 657 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून 314 विद्यार्थ्यांना नोकरी लागली आहे.
परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना आज अखेर एकूण सहा कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती रकमेचा लाभ देण्यात आला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेअंतर्गत एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025 करिता 75 जागांसाठी दिनांक 16 जून 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते, यामध्ये निवड प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती
देशातील नामवंत 200 विद्यापीठात शिकणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये शिक्षण शुल्क, लायब्ररी शुल्क, परीक्षा शुल्क, वसतीगृह शुल्क व भोजन शुल्काची 100 टक्के रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. सन 2022-23 व 2023-24 मध्ये या योजनेअंतर्गत 441 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पाच कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेसाठी 270 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेसाठी मार्च 2025 अखेर सहा कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
उदयोन्मुख कृषी औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक संधी शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजना
वसंतदादा साखर संस्था, पुणे येथील इंडस्ट्रियल फर्मिनेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी (IFAT) आणि Wine Brewing and Alcohol Technology (WBAT) विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शैक्षणिक शुल्क रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. IFAT मधील एकूण 80 विद्यार्थ्यांना 49.40 लाख व WBAT मधील एकूण 28 विद्यार्थ्यांना 34.54 लाख रूपये शैक्षणिक शुल्क अदा करण्यात आले. यापैकी 2022-23 मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण सात विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेमध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये 330 शेतकऱ्यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शेतकरी मावळा सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी 500 असून 2025 पासून हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. पशुधन संगोपन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षभरात एक हजार लाभार्थ्यांना उरळी कांचन येथील बायफ या संस्थेमार्फत 30 दिवसीय निवासी प्रशिक्षण, 60 दिवसीय प्रक्षेत्रिय प्रशिक्षण 89 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पुणे, वाशिम, कोल्हापूर, गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर, नाशिक, पालघर, बीड, रत्नागिरी या जिल्ह्यात राबवला जातो. या सर्व जिल्ह्यांत एकूण 1419 अभ्यासक्रम राबविले जात असून त्यापैकी 989 अभ्यासक्रम पूर्ण झालेले आहेत. सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आय.डी.टी.आर. भोसरी पुणे येथे हलकी व जड वाहने चालवण्याचे 30 दिवसाचा प्रशिक्षण देण्यात येते. सन 2025 मध्ये या प्रशिक्षणास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 49 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण योजनेअंतर्गत 260 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करियर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरामध्ये सन 2022 पासून ते 2025 मध्ये 19 हजार 191 विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे.
निबंध स्पर्धांचे आयोजन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा योजनेमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी विद्यार्थी व इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीत तीन लाख 16 हजार 592 इतके विद्यार्थी सहभागी झाले असून त्यापैकी 9444 इतक्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले आहे. या स्पर्धांसाठी 17 लाख 93 हजार रुपयांची पारितोषिक ठेवण्यात आली होती.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळविण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबविली जाते. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत सन 2019 पासून ते 2023 पर्यंत 3078 विद्यार्थी योजनेसाठी पात्र होते. त्यापैकी 394 विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून 103 विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास कार्यक्रम
सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत इनक्युबेशन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून स्टार्टअप कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन व विद्यावेतन स्वरूपात आर्थिक साहाय्य दिले जाते. महाराष्ट्रातील शासनमान्य यादी पैकी 13 इनक्युबेशन केंद्राने सारथी संस्थेबाबत सामंजस्य करार केला आहे. सारथीमार्फत लाभार्थ्यांना एक वर्षासाठी इनक्युबेशन केंद्राकडे प्रायोजित केले जाते. सन 2025 या वर्षी 120 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
सर्व सोयी-सुविधायुक्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल
सारथी संस्थेमार्फत पात्र विद्यार्थ्यांना प्राधान्याने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज संकुल उभारण्यात येत आहेत. या इमारत बांधकामासाठी शासनाने मोफत जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रत्येक संकुलामध्ये 500 मुलांचे वसतीगृह, 500 मुलींचे वसतीगृह, 300 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सारथी विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. सारथीच्या पुणे येथील मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून नवीन इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. इतर विभागीय कार्यालयाची कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर ती पूर्ण करण्यात येत आहेत. विभागीय कार्यालय पुणे, सारथी उपकेंद्र कोल्हापूर, विभागीय कार्यालय खारघर नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सारथी उपकेंद्र लातूर, विभागीय कार्यालय नागपूर, अमरावती यासाठी आठ जिल्ह्यात वसतिगृह, अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
सरनोबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना
सारथी मार्फत सरनोबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना राबवण्यात येत असून यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील प्रकाशित कागदपत्र, आदेश, हुकूमनामा इत्यादी दस्तऐवज पुराभिलेख संचालनालयाकडून डिजिटल स्वरूपात प्राप्त केले आहेत. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या विषयावर पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. सारथी संस्थेमार्फत शिवराज्याभिषेक अभियान, किल्ले संवर्धन, वृक्षारोपण, जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये पीएचडी करणाऱ्या 1086 विद्यार्थ्यांनी एक लाख 18 हजार 834 सीड बॉल तर अधिकारी कर्मचारी यांनी 13 हजार 600 सीड बॉल तयार केले. हे सीड बॉल 2024 मध्ये 75 किल्ल्यांच्या परिसरात टाकण्यात आले. सरदार शिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन अभियानांतर्गत 38 किल्ले व दोन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 8586 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चावडी वाचन अभियानामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांद्वारे ग्रामसभांमध्ये योजनांची माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
सारथीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम
सारथीच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी सारथीचे संकेतस्थळ https://www.sarthi-maharashtragov.in/, सारथी अँड्रॉइड एप्लीकेशन https://play.google.com/store/apps/details?id=com.srthinew, फेसबुक पेज facebook.com/sarthimaharashtra, यूट्यूब चॅनल @sarthipune१७८, इंस्टाग्राम अकाउंट https://www.instrgram.com/sarthi.pune?igsh=MTjob३g५MzNneXdoOA== आणि सारथी व्हाट्सॲप चॅनेल https://whatsapp.com/channel/००२९VaELiPmJUM२hyekQ६R१R सुरू आहे. ज्या द्वारे सारथीच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळत आहे. विविध युवा शिबिरे, सारथी दिनदर्शिका वाटप यासारखे उपक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेमुळे हजारो विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक बळ मिळत आहे. या समाजातील मागास घटकांना सक्षम, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा व नवयुगाची आव्हाने पेलणारा समाज तयार करण्यामध्ये सारथी मोलाची भूमिका बजावत आहे. योग्य शिक्षण, दिशा आणि संधी मिळाल्यास यश मिळवता येते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम सारथी संस्था करत आहे. मराठा समाजातील गरजू, होतकरू युवक व युवती या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात दरवर्षी मोठ्या प्रमाणात यश संपादन करत आहेत. मराठा समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी उपलब्ध करुन विकासाच्या प्रवाहात अग्रेसर ठेवणारी सारथी नक्कीच या समाजासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे.
– संध्या गरवारे
(खंडारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)