
कराड/प्रतिनिधी : –
मतदार याद्यांतील दुबार नावे व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले गणेश पवार यांचे उपोषण शुक्रवारी नवव्या दिवशी मागे घेण्यात आले. कराड तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला प्रशासनाकडून सुनावणी घेऊन दोषींवर प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तहसीलदार कल्पना ढवळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या हस्ते ज्यूस घेऊन पवार यांनी उपोषण सोडले.
कापिल ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश पवार यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये दुबार नावे कमी करण्याची मागणी करत उपोषण सुरू केले होते. कापिल गावातील नऊ मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा पवार यांचा आग्रह होता. गुरुवार, दि. २१ रोजीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार स्वीकारणे नाकारले होते, त्यामुळे शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.
दरम्यान, तहसीलदार कल्पना ढवळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु ताशिलदार यांनी प्रशासनाच्या वतीने पवार यांना२५ ऑगस्ट रोजी संबंधितांची सुनावणी होईल आणि दोषी आढळल्यास प्रचलित नियमानुसार कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनाचे पत्र पवार यांना देण्यात आल्यानंतर तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवार यांनी ज्युस घेऊन उपोषण संपवले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, नायब तहसीलदार हेमंत बेसके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी, पोलिस उपनिरीक्षक निखील मगदूम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.