सातारा जिल्हाहोम

कोयना वसाहतीला आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प – डॉ. सुरेश भोसले

स्व. जयमाला भोसले स्मृती उद्यान व कै. भिकोबा थोरात प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कराड/प्रतिनिधी : –

कोयना वसाहत ही कराड तालुक्यातील एक प्रगतिशील वसाहत असून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरांमुळे या गावाला विशेष ओळख आहे. गावाचा पुढील २५ वर्षांचा ठोस विकास आराखडा तयार करुन, कोयना वसाहतीला आदर्श ग्रामपंचायत करण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कोयना वसाहत (ता. कराड) येथे साकारण्यात आलेल्या स्व. जयमाला जयवंतराव भोसले स्मृती उद्यान आणि कै. भिकोबा दादू थोरात (नाना) प्रवेशद्वाराचे लोकार्पण कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आ.डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सौ. उत्तरा भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, कोयना वसाहतीच्या सरपंच सुवर्णा वळीव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, श्री शिवराज सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन शरद पाटील, व्हाईस चेअरमन सौ. प्रियांका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कोयना वसाहतीला आदर्श ग्रामपंचायत करण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोयना वसाहतीत प्रचंड क्षमता असून, आगाशिव डोंगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळाल्यास इथे पर्यटनाचे नवे केंद्र निर्माण होऊन, त्याचा लाभ आपल्या गावाला होऊ शकेल. गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. येत्या काळात गृहिणींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि सार्वजनिक जागांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, की कोयना वसाहतीमध्ये सुशिक्षित व उच्चविद्याविभूषित लोकांची मोठी वस्ती आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येत्या २५ वर्षांचा दूरदर्शी विकास आराखडा आखण्याची गरज आहे. जेणेकरुन अर्बन प्लॅनच्या धर्तीवर या गावाचा विकास होईल. येत्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाचा लाभ घेऊन, ‘सोलर ग्राम’ म्हणून कोयना वसाहतीची ओळख निर्माण करण्याचा माझा ध्यास आहे.

येत्या साडेचार वर्षांत कोयना वसाहतीतील प्रत्येक गल्लीतील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच भूमिगत गटर व ड्रेनेजसाठी आराखडा तयार करून राज्य सरकारकडून निधी आणला जाईल. गावातील सर्व स्ट्रीटलाईट सौर ऊर्जेवर आधारित करण्याचा मानस आ.डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला बालिश थोरात, प्रमोद पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सुधाकर गुरव, बाळासाहेब वाठारकर, सौ. सुनीता थोरात, सुजाता पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिवराज सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles