सातारा जिल्हाहोम

श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या कुसुर शाखेचे उद्घाटन उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जखिनवाडी यांच्या कुसुर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला.

सन 1987 रोजी अशोकराव थोरात यांनी एका सामाजिक उद्देशाने या संस्थेची स्थापना केली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक, रिक्षाचालक यांना बँकांच्या पारंपरिक व्यवस्थेतून आवश्यक ते आर्थिक सहाय्य मिळत नव्हते. त्यांच्या पतक्षमता निर्माण करून त्यांना आर्थिक बळ देणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संस्थेने वाटचाल सुरू केली. सुरुवातीला एका छोट्याशा शाखेतून कार्यास सुरुवात झाली; मात्र काळाची गरज ओळखून सन 1996 पासून शाखा विस्ताराचा निर्णय घेतला. आज 39 वर्षांच्या प्रवासात संस्था मुख्य कार्यालयासह एकूण 21 शाखांचे जाळे उभे करण्यात यशस्वी ठरली आहे. यापैकी 17 शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत ही संस्थेची विशेष कामगिरी ठरली आहे.

दि. 31 जुलै 2025 अखेर संस्थेकडे एकूण 166.58 कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. संस्थेने आतापर्यंत सभासद व ग्राहकांना मिळून 126.52 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तरलतेच्या दृष्टीने 66 कोटी रुपये मुदतठेवीत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल 12 कोटी 25 लाख असून, 13 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त राखीव निधी संस्थेने उभा केला आहे. स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने ‘अ’ वर्ग संपादन करून संस्था सभासदांचा विश्वास संपादन करत आहे. त्याचबरोबर दरवर्षी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा व आधुनिकता लक्षात घेऊन संस्थेने NEFT, RTGS, QR कोड अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन अजितराव थोरात म्हणाले, “सन 1987 मध्ये लावलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. कुसुर येथील शाखा ही संस्थेच्या प्रगतीतील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. सर्व ग्रामस्थांनी संस्थेच्या विविध योजना व सेवा यांचा लाभ घ्यावा.”

कार्यक्रमास अध्यक्ष अशोकराव थोरात, चेअरमन अजित थोरात, व्हाईस चेअरमन चंद्रकांत टंकसाळे, माजी चेअरमन सौ. अरुणादेवी पाटील, संचालक, सल्लागार व शाखा समिती सदस्य उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक राजू मुल्ला, प्रमोद शिंदे, डॉ.सौ. रूपाली गावडे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शहाजी पाटील, भारत जंत्रे, मानाजी थोरात, अण्णा काशीद, मळाईदेवी शिक्षण संस्थेचे संचालक तुळशीराम शिर्के, आनंदराव पाटील, प्रदीप पाटील, आशिष थोरात, कुसुरचे सरपंच उदयसिंह कदम, यशवंत कराळे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सौ. शर्मिला श्रीखंडे यांनी केले.

Related Articles