कृष्ण जन्माष्टमी सोहळा कराडमध्ये उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
येथील कृष्णा घाटावरील राधा-कृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. राधा-कृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्याचे हे 104 वे वर्षे होते. यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्म सोहळा असतो. त्यानुसार यावर्षी शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट रोजी कृष्णा घाटावरील गरुड मामांच्या राधा-कृष्ण मंदिरात हा जन्माष्टमी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी सहा ते आठ या वेळेत राधाकृष्णास दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळच्या अभिषेक कार्यक्रमात अनेक भाविक सहभागी झाले होते. दुपारी तीन ते पाच या वेळेत भजन सेवा संपन्न झाली. सायंकाळी पाच वाजता गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच रात्री दहा ते बारा या वेळेत सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. भक्ती देशपांडे-काणे यांचे श्रीकृष्ण जन्मकाळाचे सुश्राव्य कीर्तन मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमीस झाला, म्हणून या दिवसाला “जन्माष्टमी” म्हणतात.
श्रीकृष्ण हे धर्मसंस्थापक, दुष्टांचा संहारक व भक्तांचे रक्षण करणारे अवतार मानले जातात. या दिवशी उपवास, जागरण, नामस्मरण व कीर्तन करून भक्त भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करतात. गोकुळातील दही-हंडी, मुरली-रास, भजन-कीर्तनाद्वारे उत्सव साजरा होतो. कृष्णाच्या जन्मकथेमुळे सत्य, प्रेम, भक्ती व धर्मनिष्ठ जीवन जगण्याचा संदेश मिळतो. जन्माष्टमी हा अधर्मावर धर्माचा विजय व भक्तासाठी भगवान सदैव उपस्थित असतात, याचे स्मरण करून देणारा पवित्र दिवस असल्याचे सांगितले.
हा जन्माष्टमीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी राधाकृष्ण देवस्थान ट्रस्ट, तसेच ट्रस्टचे सर्व संचालक उत्साहात सहभागी झाले होते.