कृष्णा बँकेची उन्नत आर्थिक प्रगतीकडे वाटचाल – आ.डॉ. अतुलबाबा भोसले
बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
पारदर्शक काम व धोरणात्मक निर्णयांमुळे कृष्णा बँकेला देश व राज्यपातळीवरील विविध पुरस्कार मिळत आहेत. सभासदांच्या विश्वास व योगदानामुळेच कृष्णा बँक उन्नत आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कृष्णा सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
आटके टप्पा (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सभेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे, माजी संचालक माणिकराव जाधव, राजारामबापू कारखान्याचे संचालक बबनराव सावंत, माजी संचालक माणिकराव पाटील, कराड मर्चंट सोसायटीचे चेअरमन माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, येत्या आर्थिक वर्षात बँकेने १५०० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवला असून, बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने धोरण आखले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात बँकेला चार नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कृषी क्षेत्रात ए.आय.चा वापर, ठिबक सिंचन यासारख्या नव्या योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी कृष्णा सहकारी बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्थांचा मिळून ३००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट्य आमच्यासमोर असून, ते आम्ही नक्की साध्य करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, शेतकऱ्यांनी नवीन पिढीसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज असून, त्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्था सक्षमपणे व यशस्वीपणे कार्यरत आहेत.
याप्रसंगी कृष्णा आर्थिक परिवाराच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आणि वित्तपेटा मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीच्या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले आमदारपदी निवडून आल्याबद्दल सभासदांनी, अभिनंदनाचा ठराव करत जाहीर सत्कार केला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी अहवाल वाचून दाखविला. सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, दिलीपराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दामाजी मोरे यांनी स्वागत केले. शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले.
सभासदांना १२ टक्के लाभांश
कृष्णा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर लाभांशाची रक्कम वर्ग करण्यात आली.