आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

“फुलांनी सजलेली कृष्णामाई अन् भक्तांच्या ओवाळणीने गजबजलेले प्रीतिसंगम”

"कराड नगरीची ग्रामदैवत श्री कृष्णामाई देवीची श्रावणी यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"

कराड / प्रतिनिधी : –

कृष्णा-कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर स्थानापन्न असलेली कराडनगरीची ग्रामदेवता, श्री कृष्णामाई देवीची सरत्या श्रावणी सोमवारची यात्रा परंपरेने उत्साही वातावरणात अन् दिमाखात साजरी झाली. पावसाच्या सरी अंगावर झेलत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मनोभावे दर्शन घेताना, तिची खणा-नारळाने ओटी भरली. यात्रेमुळे अवघा कृष्णा घाट व प्रीतिसंगम परिसर कृष्णामाईच्या भक्तांनी फुलून गेला होता.

कृष्णामाई मंदिरात पहाटेपासून पुजाआर्चा, विधी, धार्मिक कार्यक्रम पार पडले. परंपरेनुसार ठिकठिकाणच्या पालख्या वाजत-गाजत मंदिरात आणल्या जात होत्या. सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तरी, भक्तांसह यात्रेकरुंचा उत्साह दरवेळप्रमाणे कायम दिसत होता. तसेच यात्रेतील पूजेचे साहित्य, मेवा-मिठाई अन् खेळणी विक्रीच्या दालनांची रेलचेल या खेपेस कायम होती.

प्रथेप्रमाणे सकाळपासून कराड पंचक्रोशीसह ठिकठिकाणच्या पालख्या सवाद्य मिरवणुकांनी देवाला घेऊन कृष्णामाईच्या भेटीला आल्या होत्या. दिवसभरात पावसाची उघडीप बघून महिला व युवतींनी कृष्णामाई देवीबरोबरच कृष्णा नदीची खणा-नारळाने ओटी भरली. दरवेळेप्रमाणे फुलांनी सजवलेल्या कमानी आणि सुवर्ण अलंकारांनी नटलेली, भरजरी साडीतील कृष्णामाई देवीचे दिव्य रूप पाहून भाविक भक्तिरसात चिंब झाले होते.

Related Articles