कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये १६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड
नामांकित मायलन लॅबोरेटरीज बहुराष्ट्रीय कंपनीत संधी; विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन

कराड/प्रतिनिधी : –
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथील नामांकित मायलन लॅबोरेटरीज या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. नामदेव जाधव म्हणाले, कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी हे देशात ६७ क्रमांकाचे एन.आय.आर.एफ. मानांकित महाविद्यालय आहे. आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच, शिक्षणानंतर उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नामांकीत कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी, संस्थेच्या ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने नियमितपणे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. तसेच आमच्या विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उत्तम संशोधन सुविधेचा लाभ मिळतो.
नुकतेच छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथील नामंकित मायलन लॅबोरेटरीज या बहुराष्ट्रीय कंपनीने कराड येथे घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि संस्थेच्या ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट विभागाच्या समर्पित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाल्याचे प्रा.डॉ. जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी मायलन लॅबोरेटरीजचे सूर्यकिरण वाघचौरे, मिलिंद सावंत, उमेश सवळे, आशिष नेर उपस्थित होते.
या यशाबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा व कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवड प्रक्रियेसाठी ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट अधिकारी डॉ. ज्योतीराम सावळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.