बोगस मतदानप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा – गणेश पवार यांची मागणी
कापील व गोलेश्वर गावातील प्रकार, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –
कापील (ता. कराड) येथील गणेश तुकाराम पवार यांनी गावातील मतदार यादीतील कथित गैरव्यवहाराबाबत, तसेच बोगस मतदानप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा आरोप करत, १४ ऑगस्टपासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
याबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले, कापील गावातील मतदार यादीत गैरव्यवहार झाल्याचे, तसेच काहींनी बोगस मतदान केल्याचे निदर्शनास आल्यानंतर १५ एप्रिल व २५ जुलै २०२५ रोजी कराड तहसीलदार व प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाद्वारे गावातील कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या प्रियांका श्रीकांत चव्हाण, रुथ मायकल काळे, स्वाती सुनिल मोरे, शितल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनिता सुरेश जाधव व स्वाती हणमंत पाटील या नऊ जणांची नावे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
विनोद मोहन कदम आणि शिवम मोहन कदम यांची नावे कापील व गोळेश्वर या दोन्ही गावात आढळून आली आहेत. तृप्ती उमेश गुणे या महिला मतदाराचे नाव कोल्हापूरचा पत्ता असणार्या आधार कार्डच्या आधारे कापील गावी नोंदवले गेले आहे. त्यांचाही गावात राहिवास नाही. तर आधार कार्डवर पत्ताच नाही, असे गोळेश्वर येथे 75 मतदार आढळून आले आहेत. या प्रकरणांची चौकशी करावी.
दरम्यान, तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवक कापील यांनी संयुक्त पंचनामाही केला. यामध्ये वरील सर्व व्यक्ती कापील गावात राहत नसून, त्यांच्या नावावर गावात शेती, घर किंवा रेशनकार्डही नसल्याचे समोर आले. तसेच पूर्वीच्या लोकसभा किंवा ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदार यादीतही त्यांच्या नावांचा समावेश नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ठोस पुरावे न सापडल्यामुळे, संबंधितांची नावे मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. मात्र, त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावीत, ही माझी मागणी नसून, संबंधित नऊ जणांनी भारत निवडणूक आयोग, तालुकास्तरीय निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि प्रशासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित सर्व नऊ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ही माझी मुख्य मागणी असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच वरील व्यक्तींनी बनावट आधारकार्ड तयार करून मतदान नोंदणी केली, दुसऱ्या गावातही त्यांची मतदार नोंद कायम असल्याचे निदर्शनास येत असून, प्रशासन व संबंधित व्यक्ती यांच्यात संगनमत असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच वरील नऊ जणांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा, १४ ऑगस्टपासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.