सातारा जिल्हाहोम

किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्थेची कोट्यावधींची जमीन गिळंकृत ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक; या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी 

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर (ता. कराड) येथील ‘नियोजीत किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.’ या संस्थेची तीन एकर जमीन गैरप्रकार करून गिळंकृत केल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संस्थेच्या चेअरमन बाबासो आनंदराव गोरे यांनी १९७५ साली सभासदांच्या योगदानातून गट क्र. १७१ मधील ३ एकर जमीन खरेदी केली होती. बाबासो गोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या वारस दयानंद बाबासो गोरे यांनी संस्थेचे नाव कमी करून स्वतःचे नाव नोंदवून जमीन विक्री केली, काही प्लॉट विकले आणि कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
तसेच, दयानंद गोरे यांनी श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्था मलकापूरचे चेअरमन वसंत रामचंद्र शिंदे यांच्याशी संगनमत करून तीच जमीन गहाण ठेवून ५५ लाख रुपये कर्ज घेतले. याशिवाय, खोटे मृत्युपत्र, फेरफार नोंदी, वारस नोंदी, आणि खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरकारी कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकरणात संबंधितांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून तक्रारदार काकासो उर्फ संजय चव्हाण आणि इतर आठ जणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आठ दिवस तुरुंगवास भोगावा लागला, असा आरोप निवेदनात आहे.
मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात गरीब कामगार सभासदांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर मधुकर चवरे, जगन्नाथ भोसले, शंकर शिंगाडे, संजय चव्हाण, कुंडलिक कुंभार, दीपक भंडलकर, मनोहर लोहार यांसह इतरांची स्वाक्षरी आहे.

Related Articles