सातारा जिल्हाहोम

“शाश्वत शेती दिन” निमित्त कराडमध्ये डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना आदरांजली

कराड/प्रतिनिधी : –

भारताचे महान कृषी शास्त्रज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव चव्हाण शासकीय कृषि महाविद्यालय, कराड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषि विभागाच्या निर्देशानुसार ७ ऑगस्ट हा दिवस “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. इंदिरा घोनमोडे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या हरितक्रांतीतील योगदानाचा आढावा घेतला.

“गहू व भात पिकांची उत्पादकता वाढवून भारताला अन्नसुरक्षा व स्वयंपूर्णता मिळवून देण्यात डॉ. स्वामीनाथन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हटले जाते. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले. तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने त्यांना ‘आर्थिक पर्यावरणाचे जनक’ ही उपाधी बहाल केली आहे,” असे डॉ. घोनमोडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उमराव बोंदर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles