कराडला आयपीएल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा होण्यासाठी प्रयत्नशील – आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
स्टेडीयमची केली पाहणी; खेळाडू, प्रशिक्षक व नागरिकांना पर्यायी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

कराड/प्रतिनिधी : –
कराडला आयपीएल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जाच्या स्पर्धा व्हाव्यात, तसेच कराडचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत, यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कराडचे नाव देश व जगाच्या क्रिडाक्षेत्रात पोहचण्यास मदत असून कराडला क्रिडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी कराडकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.
आमदार डॉ. अतुल भोसले यांनी शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमला भेट देवून पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी स्टेडीयमवर नियमित सराव करणारे खेळाडू, प्रशिक्षक व व्यवयामासाठी येणार्या नागरिकांशी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलाच्या नुतनीकरणास प्रारंभ झाल्याने खेळाडू व नागरीकांसाठी स्टेडीयम बंद केले आहे. मात्र, स्टेडीयमचे काम पुर्ण होईपर्यंत खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सूरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सुहास जगताप, अॅङ. विकास पवार, सागर बर्गे, स्मीता हुलवान, सुष्मा लोखंडे, रमेश मोहिते, विनायक कदम, विष्णू पाटसकर, प्रशिक्षक दिलीप चिंचकर, अतुल पाटील, विकी रेवणकर, सागर येळवे व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान,खेळाडू व प्रशिक्षकांनी स्टेडीयमचे काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी मैदानाची सोय करण्याची प्रामुख्याने मागणी केली. यावर आमदार डॉ. भोसले यांनी मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील अन्य मैदानांची चाचपणी केली. यानंतर शहरातील कल्याणी ग्राऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण, पोलीस ग्राऊंड, कृषी बिजगुणन केंद्राचे मैदान, तसेच एसजीएम कॉलेज, कोटणीस हॉलचे बँडमिंटन हॉल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, स्टेडीयमचे नुतनीकरण करण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधि उपलब्ध करण्यात आला असून, त्यातील पहिल्या हप्त्याचे 10 कोटी रूपये जमा आहेत. लवकरात लवकर काम सूरू करून वेळेत हे काम पुर्ण करण्याचा प्रयत्न राहिल. तसेच पैशांअभावी एकही तास काम बंद रहाणार नाही. त्यामुळे खेळाडू व कराडकर नागरिकांसाठी पुढच्या 16 महिन्यांत अत्याधूनिक स्टेडीयम वापरण्यासाठी मिळणार आहे. या स्टेडीयमवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व आयपीएल सारखे सामने व्हावेत, यासाठी अत्याधुनिक पद्धतीने स्टेडीयम बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कराडचे नाव देश व जगाच्या क्रिडाक्षेत्रात पोहचण्यास मदत होणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.