सातारा जिल्हाहोम

वडिलोपार्जित मालमत्तेच्या रक्षणासाठी कल्याणी यांची कन्या सुगंधा हिरेमठ मैदानात

३१ जुलै रोजी पुढील सुनावणी 

कराड/प्रतिनिधी : – 
प्रसिद्ध उद्योगपती (स्व.) डॉ. नीलकंठराव कल्याणी यांची कन्या सुगंधा हिरेमठ यांनी वडिलोपार्जित मालमत्तेवर आपला हक्क सांगत कऱ्हाड येथील दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला आहे. त्यांनी आज न्यायालयात अर्ज दाखल करून स्वतःला वडिलांच्या २०१२ मधील खटल्यात वारसदार म्हणून समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आहे. न्यायाधीश आर. एस. पाटील-भोसले यांनी हा अर्ज स्वीकारला असून, पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना हिरेमठ यांच्या वकील अ‍ॅड. सौ. सुखदा वागळे यांनी सांगितले की, “२००८ साली (स्व.) डॉ. कल्याणी आजारी असताना त्यांनी वडिलोपार्जित मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी आपल्या धाकट्या पुत्र गौरीशंकर कल्याणी यांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (कुलमुखत्यारपत्र) दिले होते. मात्र, त्यामध्ये दान आणि मालमत्ता हस्तांतरणाचा अधिकार देखील समाविष्ट करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गौरीशंकर यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचे नावही या दस्तऐवजात नमूद करण्यात आले.”
या अधिकारपत्राच्या आधारे कराडमधील वडिलोपार्जित मालमत्ता गौरीशंकर कल्याणी यांच्या नावे हस्तांतरित झाल्या. या प्रकाराची कल्पना (स्व.) डॉ. कल्याणी यांना नंतर मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारपत्र रद्द केले आणि २०१२ मध्ये न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, त्यांच्या निधनानंतर (२०१३) हा खटला प्रलंबित राहिला.
सुगंधा हिरेमठ यांना या घडामोडींची माहिती अलीकडेच मिळाल्याने त्यांनी कायदेशीर सल्लागार ‘आरजेडी अँड पार्टनर्स’ यांच्या सहाय्याने न्यायालयात अर्ज सादर केला. त्यात त्यांनी वडिलांच्या खटल्यात स्वतःचा वारसदार म्हणून समावेश करून घेण्याची मागणी केली आहे.

Related Articles