आरोग्य धनसंपदासातारा जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली कायाकल्पात प्रथम

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली यांनी आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची मोहर उमटवत ‘कायाकल्प’ हा शासकीय स्तरावरील मानाचा पुरस्कार पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सन 2024- 25 या वर्षात आरोग्य संस्थांच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनामध्ये रुग्ण केंद्रित सुविधा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि आरोग्य सेवेचा दर्जा या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे.

राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सातारा जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांनी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावलेला आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली यांनी राज्यभरात जिल्ह्याचा गौरव उंचावलेला आहे. या यशाबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के आणि डॉ. सुनील चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली येथील आरोग्य अधिकारी कृषाल काकासो जाधव, आरोग्य अधिकारी नेहा जाधव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जाधव दांपत्यांची आरोग्यसेवा

आटके (ता. कराड) गावचे सुपुत्र कृषाल काकासो जाधव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नेहा जाधव या प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली या ठिकाणी आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या केंद्रात उत्कृष्ट दर्जाची आरोग्यसेवा पुरवल्यामुळे व त्यांना सहकारी कर्मचाऱ्यांचे तेवढेच योगदान मिळाल्यामुळे आज या केंद्राचा राज्यभरात गौरव होत आहे. जाधव दांपत्य यांच्या आरोग्य सेवेचे इंदोली आणि परिसरातून नेहमीच कौतुक केले जाते.

 

Related Articles