कृष्णा कारखान्याचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी सन्मान; चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी स्वीकारला पुरस्कार

कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आले. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने, नवी दिल्ली येथे आयोजित शानदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री ना. प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ’ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा कारखान्याची वाटचाल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे सुरु आहे. याची दखल घेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने २०२३-२४ या हंगामासाठी उच्च साखर उतारा गटात, उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कारखान्याची निवड केली होती.
आज नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळ्यात केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्यासह संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री श्रीमती निमुबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांसह कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार, प्रमोद पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले आदी उपस्थित होते.