सातारा जिल्हाहोम

‘कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली १० हजार वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा

गेली २४ वर्षे अव्याहतपणे उपक्रम सुरु; वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –

येथील कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेली २४ वर्षे अव्याहतपणे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी मार्गावर सुमारे १० हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार देण्यात आले. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा जनसागर पंढरपूरकडे जात आहे. या अध्यात्मिक यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने गेली २४ वर्षे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जात आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथील वारीमार्गावर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, माणगंगा कारखाना, एनकूळ, कणसेवाडी, झरे, सुपली आणि पंढरपूर याठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाकडून मोफत आरोग्य तपासणी करुन, औषधे देण्यात आली. यावेळी पायी चालण्यामुळे वारकऱ्यांना होणारे स्नायू विकार, ताप, थकवा, डोकेदुखी, पायांची सूज अशा तक्रारींसाठी तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच गरजेनुसार औषधे, मलमपट्टी व फिजिओथेरपी सुविधादेखील मोफत देण्यात आली.

या आरोग्य वारी उपक्रमाला वारकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले. दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात कृष्णा हॉस्पिटलचे कॅम्प सुपरवायझर सुनील यादव, डॉ. प्रद्युम्न पोवाळकर, डॉ. निखिल पटेल, डॉ. महेश देशमुख, डॉ. अथर्व रायकर, डॉ. मयूर धामणीकर, संध्या मोरे, भाग्यश्री शिर्के, इंद्रजीत हणबर, गणपत नलवडे, शोभा दलबारे, दीपाली येडगे, रिमा मोहिते आदींसह वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles