सातारा जिल्हाहोम

कराड न्यायालयातील प्रलंबित कामांची सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी केली पाहणी

कराड/प्रतिनिधी : –

येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून, यांच्या निवारणासाठी कराड बार असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. न्यायालयातील जुन्या इमारतीच्या स्लॅब आणि पत्र्यांमधून होणारी गळती, वकिलांच्या बैठकीसाठी अपुरी जागा आणि अपुऱ्या पार्किंग सुविधांमुळे निर्माण झालेल्या अडचणींची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी अक्षय देसाई यांनी नुकतीच न्यायालयात भेट दिली.

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक थोरात यांनी या समस्या मांडत न्यायालयाच्या जुन्या इमारतीतील गळतीमुळे कागदपत्रांचे होणारे नुकसान, बार रूमच्या पत्र्याची दुरवस्था, तसेच नव्या इमारतीत वकिलांसाठी बसण्याची जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्भवलेल्या अडचणींचा आढावा सादर केला. त्यानंतर देसाई साहेबांनी आपल्या तांत्रिक टीमसह संपूर्ण परिसराची पाहणी करून अडचणींचा आढावा घेतला.

अ‍ॅड. थोरात यांनी गळती आणि पत्रा बदलण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. त्याचबरोबर, वकिलांसाठी दोन नवीन शेड बांधण्याची गरज अधोरेखित करत त्यासाठी आणि पार्किंग सुविधेसाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. थोरात यांनी कायदा मंत्रालयाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आश्वासक शब्द अधिकाऱ्यांना दिला. न्यायालयीन कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या या सुविधा लवकरच उपलब्ध होतील, अशी अपेक्षा वकिलांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Related Articles