सातारा जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेस पुन्हा उभारी घेईल – रणजितसिंह देशमुख

कराड/प्रतिनिधी : –
सध्या काँग्रेसचा संक्रमणाचा काळ असून एकप्रकारची पोकळी निर्माण झाली आहे, मरगळ आली आहे. परंतु, जनाधार कायम असून काँग्रेसला संघर्ष करावा लागेल. त्यातून सातारा जिल्हा, तसेच राज्यभरातील काँग्रेस नक्कीच पुन्हा उभी राहील, असा विश्वास सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस कमिटीचे खजिनदार कदम , कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, कराड शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, बंडानाना जगताप, अमित कदम, संजय तडाखे आदी उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, सध्या कॉंग्रेसची जिल्ह्यातील परिस्थिती पाहता नक्कीच सूक्ष्म नियोजन करून काम करावे लागणार आहे. समोर अनेक आव्हान आहेत, त्यांना सामोरे जाणार असून या सगळ्याचा विचार करूनच आपण हे पद घेतले आहे. सध्या आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम करतोय. येत्या काळात नक्कीच चांगले चित्र दिसेल. कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसाठी गतिमान पद्धतीने काँग्रेस रस्त्यावर उतरताना दिसेल. 15-20 दिवसांत संघटनात्मक बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उदयसिंह पाटील उंडाळकर यांना रोखण्यात नेते कमी पडले काय? आणि सध्या काँग्रेसमधील अन्य नेते, पदाधिकारीही अन्य पक्षांत प्रवेश करण्याच्या तयारीत? या प्रश्नावर श्री. देशमुख म्हणाले, उदयदादांना रोखण्यात नेते कमी पडले, असे वाटत नाही. ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेसला नक्कीच संघर्ष करावा लागेल. मनोहर शिंदे (भाऊ) हेही काँग्रेसमध्येच आहेत, ते कुठेही जाणार नाही, असेही त्यांनी भाऊंच्या पक्षाप्रवेशांच्या चर्चांवरील प्रश्नावर बोलताना सांगितले. तसेच पक्षप्रवेश करून गेलेल्यांना त्यांचे अनुभव विचारा, ते तेथील परिस्थिती सांगतील, असे विधानही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, पक्षाप्रवेशांच्या प्रश्नावेळी मनोहर शिंदेंनी मात्र मौन पाळल्याचे दिसून आले.
काँग्रेसमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळताना दिसत नाही, या प्रश्नावर श्री. देशमुख म्हणाले, राहुल गांधींचा संघर्ष चालू आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकांना संधी मिळत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही माझ्यासह अन्य कर्तबगार, तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी करणार आहे. येत्या काळात तळागळेपर्यंत पोहोचून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद देणार असून आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच काँग्रेसचे अस्तित्व जाणवेल, असे काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहात काय? या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. भविष्यात कोणाकोणाशी लढाई होईल, हे दिसून येईल. या निवडणुका काँग्रेसचे चिन्हावर लढणार असून जिथे गरज नाही, तिथे कोणाला बरोबर घ्यायची आवश्यकता नाही. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील नेत्यांना निर्णय घ्यावा लागेल. यासंदर्भात तूर्तास महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांबरोबर सामोपचारिक चर्चा करून निर्णय घेणार आहोत. त्यादृष्टीने आठवडाभरात यासंदर्भात जिल्ह्यात बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, रणजितसिंह देशमुख यांनी प्रितीसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष प्रतापराव देशमुख, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, पाटण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, नरेंद्र पाटणकर, पांडुरंग यादव, आनंदराव नांगरे, रवींद्र कांबळे, सतीश कांबळे, राजन कदम, सुनील गायकवाड, सुनील बरीदे, मोहन शिंगाडे आदी उपस्थित होते.