सातारा जिल्हाहोम

कृष्णा विश्व विद्यापीठ व सौख्यम् फाउंडेशनमध्ये पर्यावरणविषयक सामंजस्य करार

४० विद्यार्थिनींनी केला पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी पॅड्स वापरण्याचा संकल्प

कराड/प्रतिनिधी : –

येथील कृष्णा विश्व विद्यापीठ आणि आयुरआरोग्य सौख्यम् फाउंडेशन यांच्यामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत, नुकताच पर्यावरणविषयक आणि महिला सक्षमीकरणावर केंद्रित सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये या प्रकारचा करार करणारे कृष्णा विश्व विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले असून, हा उपक्रम शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आदर्श ठरणारा आहे.

या सांमजस्य कराराअंतर्गत ग्रामीण सक्षमीकरण आणि आरोग्य या बाबींवर विशेष भर देत, ‘पुनर्वापर करण्यायोग्य आवश्यक वस्तूंसाठी कॅम्पस’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याअंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठातील ६ अधिविभागातील एकूण ४० विद्यार्थिनींनी प्लास्टिक सॅनिटरी पॅड्सऐवजी पुनर्वापर करता येणाऱ्या सॅनिटरी पॅड्स वापरण्याचा स्वीकार करत, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प केला आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणाची जाणीव तर वाढेलच, शिवाय प्लास्टिकमुक्त पर्यावरणाकडे एक पाऊल टाकण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मान्यताविषयक प्रमुख सल्लागार डॉ. प्रविण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. युगांतरा कदम आणि संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या प्रकल्पात विद्यापीठामार्फत डॉ. शीला कदम, सौ. नितांजली पाटील, सौ. मयुरी शाह, डॉ. अश्विनी राणी, डॉ. तृप्ती दुर्गावळे आणि सौ. अश्विनी जाधव यांचा; तर सौख्यम् फाउंडेशनतर्फे संचालक सौ. अंजू बिष्ट आणि श्री. प्रविण बिष्ट यांचा सहभाग राहणार आहे. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. वसुंधरा घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles