मळाई ग्रुपचा ‘हर घर संविधान’ नाविन्यपूर्ण उपक्रम

कराड/प्रतिनिधी : –
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती नुकतीच साजरी झाली. जयंती निमित्त श्री मळाई ग्रुप व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या संकल्पनेतून “हर घर संविधान” उपक्रमांतर्गत वाचक व समाजातील विविध स्तरातील मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान प्रेमी वाचकांना गुरुवार (दि. १७) रोजी आदर्श ज्युनियर कॉलेज, मलकापूर येथे पूर्व नोंदणी केलेल्यांना संविधानाची प्रत मोफत देण्यात येणार असल्याची माहिती प्रा.सौ. शीला पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या पत्रकात म्हटले आहे की, संविधान हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, तसेच नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. संसद सुद्धा राज्यघटनेला डावलू शकत नाही. त्यामुळे भारतीय संविधान सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. दि. 26 नोव्हेंबर 1950 रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्यामुळे या दिवशी भारतभर ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. यालाच राष्ट्रीय विधी दिन म्हणतात. संविधानामुळेच आपण स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्राचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करतात. त्यातील मूलभूत हक्क व कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात. म्हणून संविधान वाचणे, माहीत असणे फार महत्त्वाचे आहे.
मानवी मूल्ये जपणारे, लोकांना स्वातंत्र्य देऊन, रक्षा करणारे, प्रत्येक जाती, धर्म, पंथ व त्यांच्या ग्रंथांचा आदर करणारे सर्वधर्म समभाव यांचा आदर करणारे, स्त्री-पुरुष यांना समान दर्जा देणारे, व सर्वांना बंधू-भावाने वागायला शिकविणारे संविधान अभ्यासले; तर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने लिहिलेल्या आदर्श मुल्यांचा अंगीकार करून आणि प्रगत लोकशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकांचे योगदान यांमुळे भारत महासत्ता बनू शकेल, यात शंका नाही. त्यामुळे सर्वांकडे संविधान असणे गरजेचे आहे. या उद्देशाने श्री मळाई ग्रुप व समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर यांची विद्यमाने ‘हर घर संविधान’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज, मलकापूरच्या प्रा.सौ. शीला पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.