पी. डी. पाटील पॅनलचा दणदणीत विजय
सह्याद्रि कारखान्यावर बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनलने तब्बल सुमारे आठ हजार मतांनी विजयश्री मिळवत कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व आबाधित राखले आहे.
पहिल्या फेरीनंतर पी. डी. पाटील पॅनलच्या सर्व उमेदवारांना चार हजारांची आघाडी मिळाली. तर दुसर्या फेरीत यामध्ये तेवढ्याच्या मतांची भर पडत संपूर्ण पॅनलने निर्विवाद विजय मिळवला. तर यामध्ये विरोधी आमदार मनोज घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे पॅनल दुसऱ्या, तर निवासराव थोरात, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचे पॅनल तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याचे दिसून आले.
शनिवार (दि. ५) एप्रिल रोजी कार्यक्षेत्रातील ९९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. एकूण मतदारांपैकी ८१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान केंद्रावरील मत पेट्या कराड येथील मतमोजणी केंद्रात जमा करण्यात आल्या. रविवार (दि. 6) रोजी सकाळी आठ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर ११.४५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्यांदा १ ते ५० मतदान केंद्रावरील मतमोजणी झाली. यामध्ये पी. डी. पाटील पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सुमारे दोन ते अडीच हजार मतांनी आघाडी घेतली. त्यामध्ये वाढ होत ही आघाडी सुमारे 4200 मतांवर पोहोचली.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सुमारे 81 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार? याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने 4200 मतांची आघाडी घेतल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.
सायंकाळी 5:30 वाजण्याचा सुमारास दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीच प्रारंभ करण्यात आला. त्यामध्येही पी. डी. पाटील पॅनलच्या उमेदवारांना सुमारे चार हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विजयाचा आकडा आठ हजारांवर पोहोचला.
दरम्यान, या संपूर्ण मतदान प्रक्रियेत सर्व 99 मतदान केंद्रांवर अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. परंतु, या निवडणुकीत कमालीची टशन दिसून आल्याने मतमोजणी व निकालावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब पाटील यांनी मतमोजणी केंद्रावर भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर श्री. पाटील मतमोजणी केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालची उधळण करीत, तसेच घोषणाबाजी केली. त्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी यांची विजयी मिरवणूक शाहू चौक, दत्त चौक, चावडी चौक, स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, तेथून स्व. पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानासमोर येवून त्याठिकाणी मिरवणुकीचे विजयी सभेत रूपांतर झाले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
· उत्पादक सभासद मतदार संघ कराड गट क्र. १ – शामराव पांडुरंग पाटील (कराड) 15027 व आण्णासो रामरव पाटील (तांबवे) 15505.
· तळबीड गट क्र. २ – संभाजी साळवे (मुंढे) 14493 व सुरेश माने (चरेगांव) 15191.
· उंब्रज गट क्र. ३ – विजय दादासो निकम (इंदोली) 14770, संजय बापुसो गोरे (पाल) 15266 व जयंत धनाजी जाधव (उंब्रज) 14788.
· कोपर्डे हवेली गट क्र. ४ – सुनिल जानदेव जगदाळे (शिरवडे) 14867, नेताजी रामचंद्र चव्हाण (कोपर्डे हवेली) 15537 व राजेंद्र भगवान पाटील (पार्ले) 14828.
· मसूर गट क्र. ५ – संतोष शिदोजीराव घार्गे (वडगांव ज.स्वा.) 14771, अरविंद निवृत्ती जाधव (पाडळी (हेळगाव) 14502 व राजेंद्र रामरव चव्हाण (कालगांव) 15089.
· वाठार किरोली गट क्र. ६ – कांतीलाल बाजीराव भोसले (तारगांव) 15498, रमेश जयसिंग माने (रहिमतपूर) 15071 व राहुल शिवाजी निकम (जयपूर) 14706.
.अनुसुचित जाती/जमाती मतदार संघ – दिपक मनसिंग लादे (गोवारे) 15570.
. महिला राखीव मतदार संघ – सौ. सिंधुताई बाजीराव पवार (वहागांव) 14815 व सौ. लक्ष्मी संभाजी गायकवाड (वाठार (कि) 14140.
. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ – संजय दत्तात्रय कुंभार (नांदगांव) 15596.
. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ – दिनकर शबकर शिरतोडे (मसूर) 15580.