श्री मळाईदेवी पतसंस्थेचा २८३ कोटींचा संमिश्र व्यवसाय
४ कोटी १९ लाखांचा ढोबळ नफा; संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केले अभिनंदन

कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जखिणवाडी संस्थेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २८३ कोटी रुपयांचे व्यवसाचे उद्दिष्ट पुर्ण केले आहे. तर संस्थेस सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ४ कोटी १९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अजित थोरात व व्हा. चेअरमन चंद्रकात टंगसाळे यांनी दिली.
तसेच व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यातही संस्थेची क्षमता व स्थैर्य भक्कम राहण्यासाठी संस्थेने सहकार कायदयानुसार एन.पी.ए.ची तरतुद पुर्ण केली आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे संस्था लाभांश देणार असून सर्व शाखांमधून लॉकर सुविधा निर्माण करण्याचा मानस चेअरमन अजित थोरात यांनी व्यक्त केला.
नुकत्याच संपलेल्या अर्थिक वर्षात संस्थेने एकंदर ठेव प्रगतीचा वेग कायम ठेवला असून, सी.डी.रेषो ६६ टक्के राखला आहे. नफा क्षमता उत्तम ठेवली असून नक्त एन.पी.ए. प्रमाण अल्प राखण्यात यश प्राप्त केले आहे. संस्थापक अध्यक्ष मा. अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लावलेल्या रोपटयाचा आज वटवृक्ष झालेचा आपणास पहावयास मिळत आहे. संस्थेच्या १९ शाखा व मुख्य कार्यालय अशा २० शाखांमधून सर्वसामान्य नागरिकांना बँकीग सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आजअखेर संसंस्थेचे ९०८१ सभासद असून, दि. ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेकडे १६१.९० कोटी ठेवी आहेत. तसेच संस्थेने गरजू लोकांना १२१ कोटी ९२ लाख रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तरलते पोटी संस्थेने विविध बँकांमध्ये ६३ कोटी ९६ लाख रूपयांची मुदत ठेवीमध्ये गुंतवणुक केली आहे. तसेच संस्थेचे वसुल भाग भांडवल ११ कोटी ९४ लाख असून, १२ कोटी १६ लाख रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केला आहे. संस्था सहकार कायदयाप्रमाणे कामकाज करून ४ कोटी १९ लाख रूपयाचा ढोबळ नफा संपादन केला आहे. संस्था स्थापनेपासून सतत ‘अ’ वर्ग संपादन करत आहे. संस्थेने अविरत जनसेवेची ३८ वर्षे पुर्ण केली आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून, कोअर बँकींग प्रणाली लागू करून सभासदांना ऑनलाईन सेवा, आरटीजीएस, एनइएफटी सेवा उपलब्ध केली आहे. तसेच संस्थेच्या एकूण शाखांपैकी १७ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत.