सहयाद्रि कारखान्यासाठी सरासरी 81 टक्के मतदान
मतदान प्रक्रिया शांततेत, आज मतमोजणीस, निकालाकडे सभासद, नागरिकांच्या नजरा

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारि सरासरी 80.98 टक्के मतदान झाले. कारखाना कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांतील एकुण 99 मतदान केंद्रावर 26 हजार 98 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज रविवारी सकाळी 8 वाजता येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 5 येथे मतमोजणी होणार आहे.
सह्याद्रि कारखान्यासाठी माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल यांच्यात तिरंगी लढत झाली. शनिवारी चुरसीने मतदान झाले. सकाळी आठ वाजता सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदान करण्यास पसंती दिल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले होते.
सकाळी आठ वाजता माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी अतीत येथे, तर निवासराव थोरात यांनी मसूर येथे आणि धैर्यशील कदम यांनी पुसेसावळी येथे मतदानाचा हक्क बजावला. जेष्ठ मतदारांसह महिला मतदारांचा मतदानासाठी उत्साह असल्याचे दिसून आले.
आज सकाळी 8 वाजता कराड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 5 येथे आज रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 50 मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत 51 ते उर्वरीत सर्व मतदान केंद्र याप्रमाणे मतमोजणी होणार आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत पर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.