काँग्रेसकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
विंग येथे शंकरराव खबाले यांच्यासह मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –
राजकारणासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. मात्र, दुसऱ्या पक्षांना जातीवादी पक्ष म्हणायचे, हा खोटारडापणा काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने होत असून शिवरायांची बदनामी करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
विंग (ता. कराड) येथील रस्ते कामाचे भूमिपूजन, तसेच जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्यासह कराड दक्षिणमधील विविध मान्यवरांचा भाजप पक्षप्रवेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी व्हॉ. चेअरमन दयानंद पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील आदींची उपस्थिती होती.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या इतिहासाला जेवढे महत्त्व दिले, तेवढे काँग्रेसच्या राजवटीत कधीही मिळाले नाही. माझे वडील आणि मी काँग्रेसमध्येच होतो. त्यामुळे हे आम्ही बघितले आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि महत्त्व जनतेसमोर येऊ दिले नाही, त्याला प्रसिद्ध दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, जनतेचे हित सर्वोपरी ठेऊन सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी काम करतील. हा पक्षप्रवेशाचा सोहळा केवळ विकास आणि राजकीय सहभागाचा नसून लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील दृढ विश्वास आणि सहकार्याचे प्रतीक आहे. भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रहित आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा विचारप्रवाह आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाने आणि सक्रिय सहभागाने पक्ष अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर शंकराव खबाले यांचा भाजप प्रवेश ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात कराड दक्षिण भाजपमय करण्याची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दिली आहे. त्यानुसार कराड दक्षिण मतदारसंघ पूर्णपणे भगवामय करण्याचे काम सुरू असल्याचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. तसेच महायुती सरकारमध्ये असलेल्या मित्र पक्षांतील लोकांना आमच्याबरोबर एकत्रपणे काम करावे लागेल, असेही त्यांनी माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.