सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
स्व. जयवंतराव आप्पा व रवींद्र बेडकीहाळ यांचा सन्मान हाच यशवंत विचारांचा खरा जागर – श्रीनिवास पाटील
स्व. जयवंतराव भोसले व रविंद्र बेडकिहाळ यांना 'यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान
91 3 minutes read

कराड/प्रतिनिधी : –
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक बाबींसोबतच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे बोट धरून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. संस्थेच्यावतीने या सोहळ्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पा व जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करुन खऱ्या अर्थाने यशवंत विचारांचा जागर केला आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता सोहळा’ कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडला. या सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विशेष अतिथी कृष्णा विश्वविद्यापिठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. व्यासपीठावर श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान सावकार, चेअरमन राजन वेळापुरे, अरुण जाधव, सौ. अलका बेडकिहाळ उपस्थित होते.
या सोहळ्यात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे (मरणोत्तर) सन्मानपत्र डॉ. सुरेश भोसले यांनी स्विकारले. तसेच ज्येष्ठ पत्रकार रविंद बेडकिहाळ यांनाही ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण यांच्या अनेक आठवणींना उजाळा देताना श्रीनिवास पाटील यांनी आपल्याला लहानपणापासून यशवंतराव चव्हाण यांचा सहवास लाभला असल्याचे सांगितले. कालिकादेवी पतसंस्था यशवंतरावांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवित आहे, असे नमूद केले. कासार गल्लीतील ही संस्था गोरगरीबांना अडचणीच्या काळात आधार बनली असून संस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी म्हटले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले यांनी कृष्णाकाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक बदल घडविण्याचे कार्य केले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा व अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी जवळपास 56 वर्षांच्या पत्रकारितेच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली. पत्रकार म्हणून आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कालिकादेवी परिवाराने दिलेले हे दोन्ही पुरस्कार पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या व्यक्तींना देवून सन्मान केला आहे.

सत्काराला उत्तर देताना श्री. रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझा गौरव आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. माझे आई-वडील व पतंगराव कदम यांच्यामुळे माझी सामाजिक जडणघडण झाली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कर्तृत्व पुढील पिढीला माहीत व्हावे, यासाठी आम्ही काम केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फलटण येथे त्यांच्याच नावाने यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन सुरू केले. या कृष्णाकाठावर यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, पी. डी. पाटील यासारखी कर्तृत्ववान माणसे होऊन गेली. त्यामुळेच आज हा परिसर सहकार, उद्योग, शिक्षण या सर्व क्षेत्रात गजबजलेला दिसतो. यशवंतराव चव्हाण उत्तम साहित्यिक होते. त्यांचे ‘कृष्णाकाठ’ हे मराठीतील अस्सल आत्मचरित्र आहे. पण त्याची दखल त्या काळात फारशी घेतली गेली नाही. यशवंतराव म्हणजे घरोघरी दीप लावत जाणारे नेतृत्व होते. आज महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे बोट सोडल्यामुळे महाराष्ट्राची अधोगती होत चालली आहे.
सत्कारला उत्तर देताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आर्थिक अडचणीच्या काळात कारखान्याला यशवंतराव चव्हाण यांनी खूप मदत केली. तर थकहमीची जबाबदारी स्वतः घेतली. यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील, वसंतदादा, राजारामबापू, रत्नाप्पा कुंभार या सर्व मंडळीनी त्या काळात कारखान्याला खूप सहकार्य केले. आज कृष्णा कारखान्यानी अनेक लिफ्ट इरिगेशन योजना सुरू केल्या आहेत. या योजनेवर आजूबाजूचे चार ते पाच कारखाने चालतात, असे सांगताना डॉ. भोसले म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नती सोबतच त्यांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी आप्पांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सुरू केले. कृष्णा सहकारी बँक, कृष्णा हॉस्पिटल या सर्व संस्थांना यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. आज त्यांचाच विचारांवर या संस्थांची वाटचाल सुरू आहे.
प्रा. अशोक चव्हाण प्रास्तविकात म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांपासून आम्ही ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ हा उपक्रम सुरू केला आहे. श्री कालिकादेवी परिवाराने केवळ आर्थिक नफा हे उद्दिष्ट न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, समाजातील गरजवंत घटकांना मदत केलेली आहे. या परिवाराकडे कोणतीही मदत मागण्यासाठी आलेला कोणताही घटक रिक्त हाताने परत गेलेला नाही.
सोहळ्याचा प्रारंभ नादश्रीचे मकरंद किर्लोस्कर व सहकाऱ्यांनी गायलेल्या यशवंतगीताने झाली. प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा. अशोक चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. संतोष मोहिरे यांनी मानले.
कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ.एम.एस सगरे, किशोर बेडकिहाळ, गोविंद बेडकिहाळ, किसनराव पाटील व कालिकादेवी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अनिल सोनवणे, संस्थापक संजय मोहिरे, संचालक शरदचंद्र देसाई, डॉ. जयवंत सातपुते, निरंजन मोहिरे, राजेंद्रकुमार यादव, सुरेश कोळेकर, जयाराणी जाधव, सीमा विभुते, औदुंबर कासार, शिरिष गोडबोले व परिवारातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
91 3 minutes read