सातारा जिल्हाहोम

विद्यमान लोकप्रतिनिधींना दक्षिणेत खिळवून ठेवले, हे आपले यश – डॉ. अतुलबाबा भोसले

काले येथे सांगता सभा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : –
विद्यमान लोकप्रतिनिधी मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी फिरुन त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. परंतु, भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे त्यांचे बाहेर प्रचाराला जाण्याचे धाडस होत नाही.  गेले 20-25 दिवस तुम्ही कराड दक्षिणसाठी काय भरीव योगदान दिले? याबद्दल त्यांना आपण विचारतोय. मात्र, त्याबद्दल ते एकही ठोस उत्तर देऊ शकलेले नाहीत. यावरून 10 वर्षांत कराड दक्षिणमध्ये काय विकास झाला, हे आपल्या लक्षात येईल, असे प्रतिपादन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ काले येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जनसमुदाय संबोधित करताना ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार आदींची उपस्थिती होती.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता – भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, तसेच जनतेला त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी काम करण्याची जनतेने मला संधी द्यावी. कराड दक्षिणचा शाश्वत विकास हे माझे धेय्य असून तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात मोठा विकासनिधी आणल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या निधीतून रस्ते, पूल, पाणंद रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मार्गी लागल्या. सध्या अनेक विकासकामे सुरु असून, बरीचशी पूर्णत्वास गेली असल्याचे लोकांना माहिती आहे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, मोदी सरकारने महिला, शेतकरी, बांधकाम कामगार व विद्यार्थ्यांसाठी असंख्य योजना राबवल्या. या सर्व योजनांचा लाभ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले आणि मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनकल्याणाचे आणि विकासाचे व्हिजन असलेल्या डॉ. अतुलबाबांना मोठे मताधिक्य देऊन, विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, तरुणांना संधी द्यायला पाहिजे, असे म्हणणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणांना संधी द्यायचे सोडून स्वत:च उमेदवारीचे तिकीट घेतले. असे सांगताना डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी केल्याची घणाघाती टीकाही केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. प्रा. मच्छिंद्र सकटे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास जगताप, मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दादासो शिंगण, शिवाजीराव थोरात, ॲड. दीपक थोरात, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles