सातारा जिल्हाहोम

पृथ्वीराजबाबांना एकनिष्ठतेचे फळ देऊया

सतेज ऊर्फ बंटी पाटील; मलकपुरला जाहीर सभा 

कराड/प्रतिनिधी : – पृथ्वीराजबाबांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतःचे घर भरले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. परंतु, कराडच्या भूमीला मोठे करणे, तुमची सेवा करणे हे पृथ्वीराजबाबांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ आपण त्यांना देऊया, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
मलकापूर, (ता. कराड) येथे राष्ट्रीय महाविकास आघाडीतर्फे काँगेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील – चिखलीकर, बंडानाना जगताप, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, नितीन काशिद, नीलम येडगे, शंकरराव खबाले, नामदेव पाटील, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले, कराड दक्षिणच्या जनेतेने पुन्हा पृथ्वीराजबाबांना महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले पाहिजेत, असे सांगून आ. सतेज पाटील म्हणाले, कोणत्याही आमिषांना बळी न पडता बाबांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2010 ते 2014 या काळात कराड दक्षिणचा जेवढा विकास झाला, त्यापेक्षा जास्त विकास होणार आहे. कराडच्या एमआयडीसीत विस्तार करण्यास मर्यादा असल्याने कराड व मलकापूर येथे आयटी हब करण्याचे माझे स्वप्न आहे.
विलासकाकांनी विचारसरणीवर बाबांनी विकासपर्व उभारले : विकासाच्या सूत्रावर विलासकाकांनी मतदारसंघाची बांधणी केल्याचे सांगत अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, पृथ्वीराजबाबांनी याच विचारसरणीवर विकासाचे पर्व उभे केले आहे. विरोधी मंडळी प्रतिगामी व व्यक्तिकेंद्रित विचाराचे आहे. ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नसून उद्योगधंद्याच्या नावाखाली समाजाला वेठीस धरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कलाकार महासंघाच्यावतीने अनिल मोरे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण जाहीर पाठिंबा दिला. तर रुग्ण हक्क समितीच्या वतीने उमेश चव्हाण यांनीही पाठिंबा दिला. तसेच यावेळी विंग येथील हनुमान वॉर्डमधील दीडशे कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Related Articles