धैर्यशील कदम यांना उत्तरेतून भाजपची उमेदवार द्यावी – पक्ष पदाधिकाऱ्यांची मागणी

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी भाजपच्या चार नेत्यांनी मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, धैर्यशील कदम यांनी मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत आणलेल्या खोट्यावधींच्या निधीतून अनेक विकास कामे पूर्ण झाले आहेत.
त्यामुळे मतदारसंघातील वातावरण त्यांच्यासाठी पोषक असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघातून धैर्यशील कदम यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी कराड उत्तर भाजपच्या वतीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी शंकरराव शेजवळ, सागर शिवदास, संपतराव माने, राजेंद्र चव्हाण, पृथ्वीराज निकम, दिपाली खोत, सीमा घार्गे, महेश घार्गे, नविन जगदाळे, श्रीकांत पिसाळ, सुमित शहा, विलास आरवडे, अविनाश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते भीमराव पाटील म्हणाले, कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचे नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, आणि मी स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत. परंतु, या मतदारसंघावर महायुतीतील घटक पक्षानेही आपला दावा सांगितला आहे. या ठिकाणी पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही काम करणार आहोत. मात्र, भाजपचे नेते धैर्यशील कदम त्यांच्यावर आतापर्यंत अन्याय झाला आहे. त्यांनी भाजपच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे आणली आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन धैर्यशील कदम यांना कराड उत्तरमधून भाजपची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, कराड उत्तरमधील उमेदवारीबाबत धैर्यशील कदम यांना विचारले असता ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात महायुतीला पोषक वातावरण निर्माण झाले असून भाजपला चार, शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीला दोन असे जागावाटप झाले आहे. दरम्यान, फलटणची जागा गेल्याने अजितदादांनी कराड उत्तर मतदारसंघ मिळण्याची मागणी केली आहे. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडेच राहिल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचे श्री. कदम यांनी यावेळी सांगितले. तसेच आपण भाजप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.