सातारा जिल्हाहोम

इंदोली येथे आढळला भारतीय अजगर प्रजातीचा दुर्मिळ सर्प

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ अजगर पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार यांच्या घराजवळ शनिवारी सायंकाळी भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) दिसून आला. कुंभार यांनी याबाबतची माहिती रेस्क्यू टीमला दिली. टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वनपाल संदीप कुंभार व सर्पमित्र अमोल पवार, रोहीत कुलकर्णी यांनी रात्री रेसक्यू करून अजगराला पकडले. सदर अजगराची लांबी 7 फूट, तर वजन 10.500 किलो होते.

त्यानंतर रविवारी सकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक संतोष चाळके, अजय महाडीक, चालक योगेश बडेकर यांनी सदर अजगराला सुरक्षितस्थळी निसर्गात मुक्त केले.

भारतीय अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प असून याचे आयुर्मान सुमारे 30 वर्षे असते. अधिवास नष्ट होणे आणि अपुरे संवर्धन यांमुळे भारतीय अजगरांची संख्या सुमारे 30 टक्के इतकी कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने नजीकच्या काळात ही जाती धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे.

Related Articles