सातारा जिल्हाहोम

आठ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र

न्यायालयाच्या आदेशानुसार कराड पालिकेतर्फे कार्यवाही; अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ

कराड/प्रतिनिधी : –

औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार कराड नगरपरिषदेच्या वतीने आठ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

औरंगाबाद उच्च न्यायलय खंडपीठाने अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबत दि. 24 जून 2024 रोजी निर्णय दिला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने दि. 12 जुलै 2024 रोजीच्या आदेशान्वये व महाराष्ट्र शासन, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी दि. 30 जुलै 2024 रोजीच्या आदेशान्वये अनुसूचित जातीमधील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना न्यायालयाच्या निर्णयानुसार नियुक्ती देता येईल, असा आदेश निर्गमित केला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गुरुवारी कराड नगरपालिकेतील आठ सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी श्रीमती सुविधा पाटील, आस्थापना प्रमुख प्रफुल्लकुमार वनखंडे, लिपीक श्रीमती रुचिका गायकवाड, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच नगरपालिका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.

Related Articles