‘सह्याद्री’च्या ‘मेगा वॉकथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
शहरात आरोग्य जागरूकतेचा उत्सव साजरा करत सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित ‘मेगा वॉकथॉन’च्या तिसऱ्या पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १२ एप्रिल रोजी झालेल्या या उपक्रमात तब्बल १४०० हून अधिक नागरिक सहभागी झाले.
सकाळी सात वाजता सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथून वॉकथॉनला सुरुवात झाली. दत्त चौक, कृष्णा नाका, चावडी चौक मार्गे ४ किलोमीटरचा प्रवास करत हा वॉक प्रितिसंगम घाटावर संपन्न झाला. नदीकाठी झालेल्या समारोपामुळे कार्यक्रमाला वेगळे आकर्षण लाभले.
डॉ. अमित माने व डॉ. चिन्मय एरम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध क्षेत्रातील नागरिक, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योग, झुंबा आणि पिलाटेस सत्रांमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गुडघा व नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (TKR/THR) झालेल्या रुग्णांचा सहभाग. २० हून अधिक रुग्णांनी आत्मविश्वासाने चालत पुनर्वसनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला. प्रारंभिक निदान व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती करण्यात आली.
मेगा वॉकथॉन ही केवळ चालण्याची स्पर्धा नसून आरोग्यपूर्ण जीवनशैलीची चळवळ आहे, असे प्रतिपादन डॉ. अमित माने यांनी केले. तर शस्त्रक्रियेनंतर रुग्णांचा आत्मविश्वासाने सहभाग ही वैद्यकीय प्रगतीची साक्ष आहे, असे डॉ. जयदीप पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप प्रीतिसंगम घाटावर झाला. सहभागी नागरिकांनी अधिक आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.



