सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखानावर रोलर पूजन उत्साहात 

कारखान्याच्या सभासदांचे हित व कामगार कल्याणाला प्राधान्य - डॉ. सुरेश भोसले

कराड/प्रतिनिधी : –

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर सन २०२६-२७ च्या हंगामासाठी मिल रोलर पूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी कारखान्याच्या प्रगतीत सभासद व कामगारांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत, त्यांच्या हिताचे रक्षण हेच पुढील वाटचालीचे ध्येय असल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलर पूजनाने झाली. त्यानंतर चेअरमन डॉ. भोसले यांनी यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ केला. या कार्यक्रमाला संचालक मंडळ, माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भोसले यांनी, कारखान्याने ऊस बिलांच्या वेळेवर देयकांमध्ये आघाडी घेतल्याचा उल्लेख केला. आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार यामुळेच कारखान्याने विश्वास टिकवला असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी हंगाम अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी कारखाना सज्ज असून, सभासदांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी, डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या मार्गदर्शनामुळे संचालक मंडळाला सहकार क्षेत्रातील अनेक बारकावे आत्मसात करता आल्याचे सांगितले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या गतिमान व पारदर्शक कामकाजावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन जगताप यांनी केले.

दरम्यान, कारखान्याशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. एमपीएससीतून टॅक्स असिस्टंटपदी निवड झालेल्या प्रज्ञा थोरात, भारत पेट्रोलियमच्या सुरक्षा रेटिंगमध्ये अव्वल ठरलेले जयंत कणसे, तसेच हस्ताक्षर स्पर्धेत राज्यस्तरीय यश मिळवणाऱ्या आविष्कार हातेकर यांचा सत्कार करण्यात आला.

कामगारांना पगारवाढ देणार 

कारखान्यातील कामगारांच्या कल्याणासाठी संचालक मंडळ नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगत, लवकरच कामगारांना पगारवाढ दिली जाईल, अशी घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. उत्तम सोयी-सुविधांसह कामगारांचे समाधान हेच प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles