काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ची साताऱ्यातून सुरुवात – आमदार मलेंदर राजन
ब्लॉक निहाय कार्यकर्त्यांशी साधला संवाद; जिल्हाध्यक्ष व अन्य संघटनात्मक पदांची पुनर्नियुक्ती

कराड/प्रतिनिधी : –
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे आमदार मलेंदर राजन यांनी कराड येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अभियान संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा निरीक्षक संजय बालगुडे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष अमित जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, अजितराव पाटील, प्रदीप जाधव, गजानन आवळकर, सयाजी पाटील, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र काँग्रेस पक्ष संघटनात्मक फेरबदलाच्या तयारीत असून, या अभियानांतर्गत राज्यभरातील ७२ जिल्हाध्यक्षांची यादी अंतिम करण्यात येत आहे. तसेच, यापूर्वीच्या पद्धतींपेक्षा वेगळेपणा दाखवत ६७५ तालुक्यांमध्ये तालुका स्तरावरही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा आणि काही मोजक्या चेहऱ्यांचे वर्चस्व याबाबत कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तळागाळापर्यंत संघटनात्मक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार मलेंदर राजन म्हणाले, सातारा जिल्ह्यासह राज्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्य जनता, महिला व शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत असून, भाजपला प्रभावीपणे विरोध करण्यासाठी पक्ष सक्षम होत आहे.
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय बालगुडे म्हणाले, राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हे वर्ष ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून साजरे करत आहे. पक्षाची ताकद केवळ नेतृत्वापुरती मर्यादित न राहता ती बूथ स्तरावरही दिसली पाहिजे, यासाठी ब्लॉक पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे अभियान जिल्ह्यात तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



