एफआरपी न दिल्यास मंगळवारपासून तीव्र आंदोलन – सचिन नलवडे

कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण एफआरपी न मिळाल्याने नाराजी वाढत असून, रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांना पत्र पाठवत आठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, अद्यापही बहुतांश कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा न केल्याने येत्या मंगळवारपासून संबंधित कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर इतर कारखान्यांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले आणि जयवंत शुगरचे विनायक भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कराड उत्तरचे अध्यक्ष विशाल पुस्तके, कराड दक्षिणचे अध्यक्ष अशोक लोहार, अनिकेत ठोंबरे, नितीन शिर्के, संतोष कणसे, सचिन नांगरे, प्रसाद धोकटे, शंकर आतकारे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या भूमिकेबाबत बोलताना नलवडे म्हणाले, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यात कृष्णा कारखान्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना योग्य दर दिला, त्यांचा सन्मान करण्याची भूमिका आम्ही घेतो. मात्र, जे कारखाने अजूनही एफआरपी देत नाहीत, त्यांनी चार दिवसांत रक्कम अदा करावी, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा नलवडे यांनी दिला आहे.



