कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णामाईची यात्रा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
कराडनगरीची ग्रामदैवता श्री कृष्णामाईची चैत्री यात्रा आज सोमवारी उत्साहात संपन्न झाली. विद्युत रोषणाई, फुलांनी मुख्य मंदिर व परिसरातील मंदिरेही सजवण्यात आली होती. तर सुवर्णालंकार अन् भरजरी साडीतील कृष्णामाईचे देखणे रूप डोळ्यात साठवत भक्तगण नतमस्तक होत होते.
कृष्णामाई यात्रा महोत्सवात रितीरिवाजाप्रमाणे पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेनिमित्त कराड शहरासह ठिकठिकाणांहून आलेल्या भाविकांनी अवघा कृष्णाघाट परिसर बहरला होता.
कृष्णामाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सालाबादप्रमाणे कृष्णामाईला पुरणपोळ्यांचा नेवैद्य दाखवत सुहासिनींकडून खणा- नारळाने देवीची ओटी भरण्यात येत होती. दरम्यान, प्रसाद, मिठाईसह खेळणी विक्रीची दालने, खाद्य पदार्थांचे हातगाडे लोकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि सालाबादप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना होऊन कृष्णामाई यात्रा महोत्सवाचा शुभारंभ झाला होता.
यानंतर दुसऱ्या दिवशी ‘नवचंडी याग’ संपन्न झाला. राजेंद्र कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा ‘गीतरामायण’ हा श्रवणीय कार्यक्रम संपन्न झाला. तर भजन, हळदी कुंकू’ पूजाअर्चा आणि ‘मन करा रे प्रसन्न’ व ‘जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम’ पार पडला आहे. तसेच दररोज महाप्रसादही वाटप करण्यात आला.
कृष्णामाई यात्रेच्या मुख्य दिवसानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ७) सकाळी ढोल ताशांच्या गजरात देवीची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. या मिरवणुकीला सुध्दा विशेष महत्व असून, मानकरी नागरिक, व्यापारी जागोजागी पालखीचे फटक्याच्या आतषबाजीत स्वागत करून, कृष्णामाईच्या पूजेच्या मूर्तीचे दर्शन घेत असतात. ही मिरवणूक मंडपात येवून विसावल्यानंतर सायंकाळी उशिरा लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कृष्णामाई यात्रा महोत्सवाची परंपरेनुसार सांगता होणार आहे.



