जनकल्याण पतसंस्थेत ५९५ कोटींच्या ठेवीं, ७ कोटींपेक्षा अधिक नफा

कराड/प्रतिनिधी : –
येथील जनकल्याण पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार आर्थिक कामगिरी करत आपल्या प्रगतीचा वेग कायम राखला आहे. ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवत संस्थेने स्पर्धात्मक बाजारपेठेतही स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार; ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे एकूण ५९५ कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून, ३६४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. याशिवाय विविध बँकांमध्ये ३१७ कोटींची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत एकूण व्यवसायात तब्बल २२ कोटींची वाढ झाली असून, संस्थेला ७ कोटींपेक्षा अधिक नक्त नफा मिळाला आहे. कर्जवसुलीतील शिस्तबद्धता आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे संस्थेने एनपीएचे प्रमाण केवळ १.८५ टक्क्यांवर नियंत्रणात ठेवले आहे. तीव्र स्पर्धेच्या काळातही सकारात्मक आर्थिक नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
संस्थेने सभासदांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये मोबाईल बँकिंग, युटिलिटी पेमेंट्स, फास्टॅग, क्यूआर कोड, आरटीजीएस, एनईएफटी, प्रीपेड डेबिट कार्ड आदी सेवांचा समावेश आहे. तसेच येत्या एक-दोन महिन्यांत UPI पेमेंट सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमा क्षेत्रातही संस्थेने पाऊल टाकत जनरल व लाईफ इन्शुरन्स योजनांद्वारे वाहन, आरोग्य, औद्योगिक व टर्म इन्शुरन्स सेवा उपलब्ध केल्या आहेत. या योजनांना सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना प्रोत्साहन म्हणून संस्थेने गेल्या १५ वर्षांत रु. ८.३२ कोटींचा व्याज रिबेट दिला आहे. चालू वर्षातील रिबेट लवकरच सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. आगामी आर्थिक वर्ष आव्हानात्मक असले तरी, त्याचा सक्षमपणे सामना करण्यास संस्था सज्ज असल्याचा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. तसेच बारामती, कोथरुड, गडहिंग्लज आणि तासगाव येथे नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या प्रगतीत सभासदांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.



