सातारा जिल्हाहोम

टीडीआर देणारी मलकापूर राज्यातील पहिली ‘क’ नगरपालिका – आमदार डॉ. अतुलबाबा भोसले 

मलकापूर नगरपालिकेच्या वर्धापन दिनी विविध विकासकामांचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्रातील अत्यंत चांगली नगरपालिका म्हणून मलकापूर नगरपालिकेने नावलौकिक मिळवला असून, टीडीआर प्रमाणपत्र देणारी ही महाराष्ट्रातील ‘क’ वर्ग दर्जाची पहिली नगरपालिका ठरली आहे. मलकापूर अल्ट्रा मॉडेल बनवण्याच्या दृष्टीने तयारी केली असून, पुढील २५ वर्षांचा विकास लक्षात घेऊन विकासकामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसलेबाबा यांनी दिली.

कराड आणि मलकापूर शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडले. ‘अभियान ते अभिमान’ असा कार्यक्रम राबवत, मलकापूर नगरपालिकेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त मलकापूर नगरपालिकेच्या ९० दिवसीय अभियानाचा शुभारंभ आणि त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नियोजन व विकास समिती सभापती सूरज शेवाळे, आरोग्य समिती सभापती धनंजय येडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली पाटील, उपसभापती गीता साठे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हणमंतराव जाधव, नगरसेवक दादासो शिंगण आदींची उपस्थिती होती.

यावेळी आमदार भोसले म्हणाले, शहराच्या विकासाठी टीडीआर प्रमाणपत्र प्रदान करणे खूप महत्त्वाचे आहे. शहर विकासात एक गुंठा जमीन गेल्यास त्याला या प्रमाणपत्रानुसार दोन गुंठे जमीन मिळणार आहे. मलकापूरच्या लोकसंख्येच्या प्रमाणात याठिकाणी तशाप्रकारच्या सुविधा उभारणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणणार आहे. ‘क’ वर्ग मलकापूर नगरपालिकेची इमारत राज्यात सर्वात मोठी करण्यासाठी प्रयत्न आहे. घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष तेजस सोनवणे म्हणाले, माझी वसुंधरा अभियान युद्ध पातळीवर राबविण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे. मलकापूर नगरपालिका एक कालबद्ध दिनक्रम घेऊन 90 दिवसांचे अभियान राबवत आहे. हे केवळ अभियान नाही, तर नव्या व्यवस्थापन, सेवाभावी प्रशासन आणि अंमलबजावणीतून धेय्यपूर्तीचा 90 दिवसांचा आखीव-रेखीव कार्यक्रम राबविणार आहोत. ५ एप्रिल ते ४ जुलै या ९० दिवसांच्या कालावधीमध्ये २४ तास नळ पाणीपुरवठा योजना बळकटीकरण, नगर नियोजन, बांधकाम व पायाभूत मूलभूत सुविधा, इ-गव्हर्नर उपक्रम, सांडपाणी प्रक्रिया योजना, घनकचरा व्यवस्थापन बळकटीकरण, प्लास्टिक निर्मूलन मोहीम, प्रभाग निहाय लोकसहभागातून स्वच्छता, प्रशासन आपल्या दारी उपक्रम, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविणे, मलकापूर पालिकेच्या सर्व विभागांतर्गत झिरो पेंडन्सी मोहीम राबविणे आदी उपक्रमांचा यात सहभाग आहे.

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरदृष्टीतून मलकापूर शहराचा भविष्यातील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार केला पाहिजे, असे सांगितले होते. आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २०५२ सालाच्या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सध्या ९० दिवसांच्या अभियानात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने २४ तास पाणीपुरवठा योजनेसह सांडपाणी योजनेचेही विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सोलरच्या माध्यमातून स्वयंपूर्ण वीज निर्मिती करणारे शहर म्हणून मलकापूरने एक पाऊल पुढे टाकले असून, सोलर यंत्रणा बसवणाऱ्या नागरिकांना वार्षिक करामध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल. तसेच प्लास्टिक व कचरा मुक्त शहर बनवण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहराच्या विकासात झालेल्या जमीन बाधित नागरिकांना आ. अतुल भोसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टीडीआर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न मार्गी लावत त्यांना सदरच्या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

मलकापूर शहर राष्ट्रीय महामार्गामुळे दोन भागात विभागले गेले आहे. त्यामुळे वर्दळीच्या भाग असलेल्या ढेबेवाडी फाटा ते बैल बाजार रोड या महत्वपूर्ण भागांना ८० फुटी कनेक्टिव्हिटी रोडने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैर से दूर होणार असून, त्यांना चांगल्या दर्जेचा पर्याय रस्ता उपलब्ध होणार असल्याचे आमदार अतुल भोसले व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले.

मलकापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची विकासकामे पाहण्यासाठी क्षेत्रभेट पाहणी दौरा काढावा. या पाहणी पर्यटन दौऱ्यासाठी मी माझ्या आमदारकीच्या एका महिन्याचा पगार देत असल्याचे देखील आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

Related Articles