संरक्षण भिंत व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन
दैत्यनिवारणी मंदिर परिसराला नवे रूप; ५ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ, वर्षभरात काम पूर्णत्वास - आमदार डॉ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : –
शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री दैत्यनिवारणी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला अखेर गती मिळाली असून, सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंत व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. दैत्यनिवारणी मंदिर हे कराडकरांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने या विकासकामांमुळे भाविकांना अधिक सुविधा मिळणार असून, मंदिर परिसर अधिक सुरक्षित व आकर्षक होणार असल्याने परिसराला नवे स्वरूप प्राप्त असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आ. भोसले म्हणाले, विधानसभा सदस्य होण्यापूर्वीच या कामासाठी पाठपुरावा करून राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेतला होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता मूर्त स्वरूप येत असून, सर्व अडथळे दूर करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करून नागरिकांना समर्पित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत सुमारे २२० मीटर लांबीची आणि साडेसात फूट उंचीची गॅबियन पद्धतीची संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात सुमारे ११०० चौरस फूट क्षेत्रावर पेव्हर ब्लॉक बसवून दगडी पिचिंगद्वारे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच सुरक्षिततेतही भर पडणार असल्याचे त्यान इ सांगितले.
कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, भाजप शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे, माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगरसेवक शिवाजी पवार, अजय पावसकर, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, आशुतोष डुबल, अतुल शिंदे, सुहास जगताप, राजेंद्र माने, रणजित पाटील आदींसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.



