श्री कालिकादेवी पतसंस्थेचा ३१७ कोटींचा विक्रमी व्यवसाय
३.७५ कोटी निव्वळ नफा, एनपीए शून्य; महाराष्ट्रभर विस्ताराची तयारी - मुनीर बागवान सावकार

कराड/प्रतिनिधी : –
कराड येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक क्षेत्रात भक्कम वाटचाल करत असून, 2025-26 या आर्थिक वर्षात संस्थेने तब्बल ३१७ कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय नोंदवला आहे. संस्थेने आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला असून विविध शहरांत नवीन शाखा सुरू करून विस्तार साधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती देताना संस्थेचे प्रमुख मुनीर बागवान सावकार म्हणाले, संस्था आता आपल्या स्थापनेच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे संस्थेची प्रगती सातत्याने होत आहे.
या प्रसंगी चेअरमन राजन वेळापूरे, उपाध्यक्ष अनिल सोनवणे, संचालक मंडळातील अरुण जाधव, प्रा. अशोककुमार चव्हाण, शरदचंद्र देसाई, डॉ. संतोष मोहिरे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे उपस्थित होते.
संस्थेने चालू वर्षात ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान, संस्थेच्या सातारा शाखेनेही १० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा टप्पा पार करून आपली कामगिरी अधोरेखित केली आहे.
संस्थेची वाटचाल केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ती सक्रिय आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांना १ ग्रॅम सोन्याचे नाणे देऊन गौरव करण्यात आला होता, तर ३० व्या वर्षी ३० टक्के लाभांश देत सभासदांना विशेष लाभ देण्यात आला होता.
तसेच, स्व. यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार राज्यस्तरावर प्रदान करण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. यंदापासून स्व. सौ. वेणूताई चव्हाण महिला शक्ती गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला असून महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर, २४ मे २०२६ रोजी कराड येथील श्री कृष्णाबाई सांस्कृतिक भवन येथे भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन दरवर्षी आयोजित करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.



