कराड अर्बन बँकेने ओलांडला व्यवसायाचा ६५०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा – अध्यक्ष समीर जोशी यांची माहिती

कराड/प्रतिनिधी : –
कराड अर्बन बँकेने प्रगतीची परंपरा कायम राखत व्यवसायामध्ये आजवरील सर्वात मोठी ऐतिहासिक रु.७५० कोटींची वाढ केवळ नऊ महिन्यात साध्य केली आहे. त्याचप्रमाणे वसुलीच्या आघाडीवरदेखील नक्त एन.पी.ए.चे प्रमाण सलग तीन वर्षे ‘शून्य’ टक्के राखण्यात यश मिळाले आहे. मार्च २०२६ अखेर ठेवींमध्ये रु.४२७ कोटींची वाढ होत वर्षअखेर ठेवी रु.४००१ कोटी तर कर्जव्यवहारात रु.३२१ कोटींची वाढ नोंदवित एकूण कर्जव्यवहार रु. २५८५ कोटींचा झाला आहे. त्यामुळे बँकेने व्यवसायाचा रु.६५०० कोटींचा टप्पा ओलांडत मार्च २०२६ अखेर एकूण व्यवसाय रु.६५८६ कोटी साध्य केला आहे. बँकेला मिळालेले यश हे सेवक व संचालक यांच्या उत्तम टीमवर्कचे फलित आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी केले.
बँकेला करपूर्व ढोबळ नफा रु.७०.५८ कोटी तर कर व तरतुदीनंतर निव्वळ नफा रु.२६.५२ इतका झाला आहे. बँकेने नक्त एन.पी.ए.चे प्रमाण ‘शून्य’ टक्के राखण्यात सातत्य राखत जुन्या अनुत्पादित खात्यांमधून गत आर्थिक वर्षामध्ये रु.३३ कोटींची वसुली; तर राईट ऑफ करण्यात आलेल्या खात्यातून रु.१.७५ कोटींची वसुली करण्यात नियोजनबद्ध प्रयत्नांद्वारे यश मिळवले आहे. परिणामी ढोबळ अनुत्पादक जिंदगीमध्ये देखील २.१५ टक्क्यांनी घट नोंदवित बँकेचा आर्थिक पाया अधिक भक्कम करता आला आहे आणि बँकेच्या दीर्घकालीन सक्षम वाटचालीसाठी ही बाब अत्यंत उपयुक्त आहे अशी माहिती माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
सर्वच आर्थिक व्यवहार डिजीटल करण्याकडे वाढता कल असताना बँकेने जवळपास दोन वर्षांपूर्वी मोबाईल बँकिंगचा शुभारंभ केला होता. दिवसेंदिवस बँकेच्या विविध डिजिटल सेवांचा लाभ मोबाईल बँकिंग प्रणालीद्वारे ग्राहक घरबसल्या घेत आहेत. दररोज यू.पी.आय. द्वारे व्यक्तिगत ३० हजाराहून अधिक व्यवहार होत असून व्यापारी वर्गदेखील याचा लाभ घेत आहे. गत आर्थिक वर्षात बँक यूपीआय अॅक्वायरर झाल्याने बँकेचा स्वतःचा यूपीआय आयडी @okkucb असा असेल. येत्या आर्थिक वर्षात या सेवांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या डिजीटल बदलांचा अंगीकार करत बँकेमध्ये कर्ज प्रोसेसिंग व कर्ज मंजुरी व्यवहारदेखील डिजीटल प्रणालीचा माध्यमातून अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे अशी माहिती माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन व विविध ठिकाणी सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक आर्थिक आव्हाने उभी राहत असताना, बँकेने व्यवसायवाढीबरोबरच स्वभांडवलाचा पाया मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिले असून रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित सी.आर.ए.आर. प्रमाणापेक्षा २% ने अधिक भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. बँकेने मिळवलेले हे यश; बँक अतिशय उत्तमपणे व प्रगतीपथावर वाटचाल करते आहे हा विश्वास सभासदांना देणारे आहे असे मत बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी म्हणाले, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्जरोखे व्यवहारात झालेल्या मोठ्या पडझडीमुळे सिक्युरिटीज्च्या बाजारमूल्यामध्ये लक्षणीय घट झाली; परिणामस्वरूप रिझर्व्ह बँकेच्या याबाबतच्या परिपत्रकीय निर्देशाप्रमाणे यामधील घसाऱ्यापोटी एकंदर रक्कम रु.४३.४३ कोटींची तरतूद करावी लागली आहे. बँकेने आर्थिक सक्षमता उत्तमपणे जपली असल्याने, याही परिस्थितीवर यशस्वी मात करत एवढी मोठी तरतूद करूनदेखील सभासदांना चांगला लाभांश देता येईल असा म्हणजे रु.२६.५२ कोटींचा निव्वळ नफा मिळवणे शक्य झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नव्यानेच नियुक्ती झाल्याने कामकाजासाठी केवळ नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला असला तरी सर्व सेवक, ग्राहक आणि सभासद यांच्या सक्रिय सहभागाने बँकेच्या इतिहासातील सर्वोच्च व्यवसायवाढीची नोंद करता आली याचे मोठे समाधान आहे. भविष्यकाळात देखील शून्य टक्के एन.पी.ए. कायम राखणे, व्यवसाय वाढीत सातत्य ठेवत वाटचाल आणि बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करणे हेच आमचे सर्वांचे प्रमुख ध्येय राहणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही संस्थेची प्रगती ही कोणाही एका व्यक्तीवर कधीच अवलंबून नसते, तर त्या संस्थेच्या कारभारावर सभासद, ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास आणि व्यवहारातील पारदर्शकता तसेच संचालक व सेवकांचे एकत्रित टीमवर्क आणि जपलेली नीतीमूल्ये यावरच कोणत्याही संस्थेचे अस्तित्व, प्रगती अवलंबून असते हे सार्वकालिक सत्यदेखील गेल्या आर्थिक वर्षातील कराड अर्बन बँकेच्या वाटचालीतून अधोरेखित झाले आहे. भविष्यातही बँक चांगल्या कामगिरीच्या गुणवत्तेसह द्विशतकी वाटचाल नक्कीच दिमाखदारपणे करेल यात शंकाच नाही.
– सुभाषराव जोशी (कराड अर्बन कुटुंबप्रमुख)



